जंगल, जमीन, जल व जैवविविधता यावर ‘जन’ आधारलेला आहे. ‘जन’ या अर्थाने जनसंख्या म्हणजेच मानव या अर्थाने हा एकमेव घटक आहे. पृथ्वी हा सजीवसृष्टी असलेला एकमेव ग्रह आहे. जैवनिर्मितीच्या प्रक्रियेत पृथ्वीवर वेगवेगळे सजीव निर्माण झालेत. जैवनिर्मितीची ही प्रक्रिया सतत व समवर्ती असून स्थलकाल सापेक्ष आहे. उत्क्रांतीनुरूप पृथ्वीवरील सजीवसृष्टीत नियमन व त्यानुरूप बदल होत गेले. मानव आणि जंगल यांच अस्तित्व हा याचाच एक भाग आहे. निर्मितीच्या प्रक्रियेत पर्वतरांगामध्ये पर्यायाने जंगलातच माणसांचे अस्तित्व होते. याचे अनेक दाखले आजही उपलब्ध आहेत. मानववंशशास्त्राचे सिंहावलोकन करताना हे आपल्या सहज लक्षात येते. उपलब्ध अनेक संदर्भांची ‘याची देही याची डोळा’ आपल्याला प्रचीती घेता येते. आदिमानवांनी सुमारे १५ हजार वर्षापूर्वी सातपुडा पर्वतरांगेतील गुहांमध्ये जिराफ व इतर प्राण्यांची चित्रांची रेखाटणे काढलेली आहेत. कोकणातही अलीकडेच अनेक प्राचीन कलांचा शोध लागला. प्राचीन ग्रंथसंपदा मध्ये सुद्धा मानव आणि जंगल यांच नात घट्ट असल्याचे अनेक दाखले उपलब्ध आहेत. इतकच काय तर जंगल व पर्यायाने निसर्ग यांच्याशिवाय मानवाच अस्तित्व असूच शकत नाही हे वास्तव आहे. म्हणूनच हे सर्व समजून उमजून मानवासहित संपूर्ण सजीवसृष्टी सहजीवनाचा धागा धरून सुखसमाधानाने नांदत होती. या सहजीवनाचे स्थलकाल सापेक्ष असलेले अनेक संदर्भ महत्वपूर्ण ठरले असून ते आजही आपल्याला अनुभवता येतात. सहजिवनातले जीवन जगताना माणूस जंगलातून आपल्या गरजाही पूर्ण करू लागला. आणि जंगलाचा एक भाग असल्याने जंगल संवार्धानातही अप्रत्यक्ष हातभार लावू लागला. त्यावेळी प्राणवायू, पाणी व अन्न अश्या मोजक्याच आपल्या मुख्य मुलभूत गरजा होत्या. या सर्व गरजा जंगलपूरक होत्या.

जंगलातील प्राणवायू देणारी वृक्षसंपदा, पाणी व अन्न देणारे जंगल म्हणूनच महत्वपूर्ण ठरले आहे. ‘जंगल नदी की मां है’ हे वाक्य खूप बोलकं आहे. पावसाच पाणी भूपृष्ठावर पडल की हे पाणी जंगलामुळे भूगर्भात अधिक चांगलं मुरते. थोडक्यात पावसाचा प्रत्येक थेंब खाली पडताना तो झाडावर पडतो. जंगलातील झाडे गवत व पालापाचोळा पाण्याला अडवितो. यातून भूजल पातळी भक्कम वाढते. भूजल पातळी वाढली की झरे फुटतात. झऱ्यांचे ओहोळ मग नाले अन पाहता पाहता त्याचे नद्यात रुपांतर होते. नद्या वाहू लागतात. आपल्या गरजेसाठी आपण नद्यांच पाणी अडवून धरणे बांधली. त्या धरणाचे पाणी आणि भूजलातील पाणी विहिरींच्या सहायाने आपण पिण्यासाठी वापरतो. शेतीसाठी सुद्धा पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. म्हणजेच तहान भागविण्याच आणि अन्न उगविण्याच जीवनावश्यक काम केवळ पाण्यामुळे होते. याच एक सुंदर गणित आहे. ‘जंगल वाचली तर नदी वाचेल, नदी वाचली तर पाणी आणि पाणी वाचले तर मानव….!’ इतकं साध सोप असलेलं हे गणित आज मात्र मानवाला कळेनास झालं आहे. यामध्ये आदिमानवांनी लावलेला आगीचा शोध खऱ्या क्रांतिकारी ठरला. पुढे दैनदिन जीवनात आलेला धातूंच्या वापराने मात्र मानव अधिकच प्रगत झाला. पुढे शेतीचा शोध लागला. भटक्या शेती पद्धतीतून उपजीविका असा सुरु झालेला हा प्रवास आता व्यापारी शेतीवर येऊन ठेपला आहे. मानवाच्या उपजीविकेची परिभाषा सुद्धा बदलली आहे. मानव आपलं जीवन व्यतीत करताना त्याच्या गरजांचेही संदर्भ बदलत गेले. घरासाठी लागणारे लाकूड, सरपण, वनऔषधी, गुरांसाठीचा चारा, धार्मिक तीर्थक्षेत्र, प्यायला व शेतीसाठी लागणारे पाणी व पर्यटनाच्या आधाराने मानव आपले अस्तित्वासाठी जंगलावर हळूहळू हक्क सांगू लागला. आजच्या आधुनिक काळात मात्र याचे पर्यावसान मालकीच्या रुपाने पुढे आले. आपआपल्या सोयीने मानवाने जंगल आधारित उद्योगांची निश्चिती केली. जंगलात जाऊन नवनवीन प्रयोग करायला सुरवात झाली.

आजचे चित्र मात्र फारच भयाण झाले आहे. केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील एकच उदाहरण यासाठी पुरेस आहे. चंद्रपूर जिल्हा म्हणजे जंगल व व्याघ्र केंद्रित पर्यटन असलेला जिल्हा होय. जिल्ह्यातील बऱ्यापैकी अर्थ व राजकारण हे कोळसा व इतर खनिज अनुषंगिक उद्योग तथा पर्यटन यावर अवलंबून आहे. म्हणून अलीकडे ताडोबा जंगल सातासमुदारापर पोहोचले. इतक्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबालगतच्या स्थानिक लोकांनी स्थानिक रिसोर्ट विरुद्ध बंड पुकारले आहे. वनपर्यटनाचा फायदा स्थानिकं आदिवासींना होण्याऐवजी आधीच गब्बर असलेल्या रिसोर्ट मालकांना होतोय. असे स्थानिक गावकऱ्यांचे म्हणणे आहे. लोकसमुदायातून वनसंवर्धन या संकल्पेनला हरताळ येथे फसल्या जात असल्याच्या त्यांचा आरोप आहे. नवनवीन येणारे उद्योग आणि खाणसम्राट यांचा येथे सुकाळ झालाय. संघर्षाची अशीही किनार असू शकते हेही नवलच..!

भारतातील अनेक जंगलात अनेक आदिवासी जमाती राहतात. महाराष्ट्रातही कमीअधिक प्रमाणात हीच परिस्थिती आहे. ठाणे जिल्ह्यातील वारली, गडचिरोली जिल्ह्यातील गोंड व कोलाम, यवतमाळ जिल्ह्यातील आंध, तर अमरावती जीह्ल्यातील कोरकू अश्या काही प्रमुख आदिम जमाती व आदिवासींचा उल्लेख करता येईल. यातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा एक संदर्भ म्हणून विचारात घेतल्यास मानव व जंगलाचे नाते अधिक स्पष्ट होईल. मेळघाटातील आदिवासी कोरकू आणि जंगल यांच नात जन्मजातच आहे. मेळघाटचे जंगल सागबहुल वृक्षाने दाटले आहे. सागाच्या झाडाला कोरकू भाषेत ‘सिपना’ म्हणतात. सागाच्या बनातून वाहणारी नदी म्हणजेच कोरकू भाषेत ‘सिपना’ होय. मेळघाटातील वने व वन्यजीवन हे कोरकुंच्या संस्कृतीमधील अविभाज्य अंग आहे. या अर्थाने याआदिवासी समुदायाचा म्हणजेच मानवप्राण्याचा जंगलाशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे. जंगल व आदिवासी यांचे जीवन परस्परपूरक आहे. पूर्वापारपासून चालत आलेल्या आदिवासी समाजाच्या रुढी परंपरा व संस्कृतीमध्ये जंगलाच महत्व अनन्यसाधारण आहे. मोह, वड, पिंपळ, पळस, उंबर, जांभूळ या वृक्षांचा त्यांचा जीवनाशी प्रत्यक्ष संबंध असून प्राणी, पक्षी, फुलपाखरे, कोळी यांचाही अप्रत्यक्ष संबंध येतोच. वाघ हा मेळघाटच्या जंगलातील मुख्य प्राणी आहे. मेळघाटातील कोरकू संस्कृतीत वाघाला आईचा भाऊ संबोधून ‘कुला मामा’ म्हणून ओळखले जाते. कोरकू आणि कुला यांच नात मेळघाटच्या जंगलात अगदी निरागसतेने फुलत गेल्याचे अनेक दाखले देता येतील. कोरकू लोकगीतांमध्ये देखील कुला मामाचे अनेक संदर्भ आजही आहेतच. मेळघाट परिसरातील अनेक गावांची नावे व नैसर्गिक पाणवठे हे वने व वन्यजीवनाला प्राधान्य देऊन निर्माण झाली आहेत. कुलाचावडी, कुलाकुंडी, कुलाखोरा, कुलादेव ही कुलाच्या नावाने, बाणा म्हणजे अस्वल म्हणून बाणाच्या नावाने ‘बाणाआम’, डोंगरसीटा म्हणजे रानकुत्रा त्याच्या नावाने ‘सिटाडोह’ अशी अनेक नावे स्थानिक ठिकाणांना पडली आहेत. कोरकू भाषेत प्राणी, पक्षी व इतर जैवविविधता यांना वेगवेगळया नावाने ओळखले जाते. मी मागील १७ वर्षापासून मेळघाट परिसरात वन्यजीव व कोरकू समाजाच्या अभ्यासासाठी भटकंती करतोय. कोरकू व त्यांची जीवनपद्धती जाणून घेताना त्यांचे वन व वन्यजीवविषयक ज्ञान जाणून घेण्यात मला आवड निर्माण झाली. यातून बऱ्याच गोष्टी व नवनवीन माहिती मिळाली. साग व बांबूचे कोरकुंच्या होळीत व मेघनाथ पूजेत खास महत्व आहे. अश्या अनेक अंगाने कोरकू आणि वन्यजीवन यांचे महत्व स्पष्ट होते. कोरकुंचा एक वेगळा दृष्टीकोन यात आपल्याला दिसून येतो.

मात्र आपण इतिहासात प्राचीन मानव संस्कृती व आताची प्रगत संस्कृती यामध्ये प्रचंड तफावत आपल्याला दिसून येते. मानव व जंगल असे सहजीवन तत्व असतांनाच कालानुरूप यापैकी श्रेष्ठ कोण अशी भावना माणसाच्या मनात उदयास आली असावी. म्हणूनच वेळोवेळी मानवाने निसर्गावर अधिराज्य मिळविण्यासाठीची एकही संधी सोडली नाही. या अर्थाने मानव यात बराच पुढे निघाला. तो आपल्या बुद्धीनुरूप पृथ्वीवर व पर्यायाने इतर सजीवांवर वेगवेगळे प्रयोग करू लागला. पक्ष्यासारख उडता यावं या भावनेतून विमानाचा शोध, फुलपाखरांच्या पंखातून सौर उर्जेचा शोध, दिवसा सुद्धा सूर्य सदृष्य प्रकाश देणारी वस्तु म्हणून विजेच्या दिव्याचा शोध यासह अनेक शोध गरजेतून तो शोधत गेला. मानवाची जागा यंत्राने घेणे म्हणजेच औद्योगीकरण आणि त्यानुरूप उगमास आलेले अधुनिकीकरण अश्या संकल्पना जन्माला आल्या. अश्यातच आदीवासी, ग्रामवासी व नगरवासी असी त्रिस्तरीय वस्तीव्यवस्था निर्माण झाली. वनात राहणारे आदिवासी, गावात राहणारे ग्रामवासी तर नगरात राहणारे नगरवासी अशी व्यवस्था नावारुपास आली. पूर्वी संख्येने अधिक लोक वनात राहायचे, त्याहून कमी गावात अन त्याहून कमी नगरात राहायचे. मात्र आताचे हेच संख्याप्रमान व्यस्त झाले आहे. कालांतराने आता खेडी व प्रगत शहरे निर्माण झाली. याचीच परिणती म्हणजे निसर्गाचा अविभाज्य घटक असलेला मानवप्राणी मात्र निसर्गापासून दुरावत गेला. आज या नात्यात मोठी दरी निर्माण झाली आहे. पर्यायाने पृथ्वीवरील संपन्न जैवविविधता धोक्यात आली. अन्नजाळे व अन्नसाखळी सुध्दा कमालीची प्रभावित झाली. काही सजीव नष्ट झालेत तर काही नष्ट होण्याचा मार्गावर आहेत.

विकास या गोड वाटणाऱ्या संकल्पनेचा आसरा घेऊन ज्याला वाटते तो तसे जंगल ओरबाडन्यात कुठेच विकास कमी पडत नाही. याचीच परिणती आज जगातील सन १९९० मध्ये ३२ % हून अधिकं असलेले जंगलाचे प्रमाण सन २०१५ मध्ये ३१ % पर्यंत खाली आले आहे. भारतात २१.५ % जंगलव्याप्त जमीन असून महाराष्ट्रात हेच प्रमाण २० % पर्यंत खाली आले आहे. तर दुसरीकडे जगाची लोकसंख्या आज ७५० कोटी हून अधिक आहे. भारताची लोकसंख्या २०११ मध्ये १२१ कोटी इतकी होती. सन १९०१ मध्ये २० कोटी असलेली भारताची लोकसंख्या २०११ मध्ये ३५० %हून अधिक प्रमाणात वाढली. म्हणजेच वाढती लोकसंख्या व कमी होत चाललेले जंगल क्षेत्र आणि त्याच्या जंगलावर निर्माण होणारा ताण हाच मोठ पेच निर्माण झाला आहे. यातून निर्माण झालेला मानव वन्यजीव संघर्ष हा एक नवा महाप्रश्न जगासमोर येणाऱ्या काळात मोठे आवाहन ठरणार आहे. भारतातील केवळ हती व मानव संघर्षाच्या विचार करता, सन २०१४ ते २०१७ या चार वर्षात एकूण ७८,६५६ इतक्या संघर्षाच्या घटना घडल्या. यामध्ये तब्बल १०० हून अधिक हतींचा बळी गेला. तर ३०० हून आधीकं मानवमृत्यमुखी पाडले. वाघाच्या बाबतीत ३०० हून अधिक घटना घडल्या. महाराष्ट्रातील एकट्या नाशिक जिल्ह्याचा विचार करता नाशिक वनविभागात गेल्या १९ वर्षात ३० नागरिक मृत्यू, ९८ जखमी, तर ४६१६ एकूण वन्यहल्ल्याच्या घटना घडल्या. पाळीव प्राणी हल्ल्यात ५८२७ प्राणी जखमी झालेत. यासाठी नाशिक वनविभागाने ३ कोटी ७० लाखाची भरपाई दिली. सन २०११ ते २०१७ दरम्यान एकट्या महाराष्ट्रात २ लाखाहून अधिक मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना घडल्या. यासाठी शासनाचा अंदाजे ४० कोटी खर्च झाला. सध्या यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा व राळेगाव भागात वाघिणीने केलेल्या हल्यात १४ लोक मृत पावले. तर दुसरीकडे वाढती शिकार, अधिवास अवनती व ऱ्हास आणि जंगलतोडीमुळे भारतातील वाघांची संख्या केवळ २२०० इतकीच शिल्लक राहिली. वास्तविकतः १९ व्या शतकाच्या सुरवातीला भारतात चाळीस हजाराहून अधिक वाघ होते. गेल्या शतकात ९७% इतकी व्याघ्रसंख्येत झालेली घट चिंताजनक आहे. केवळ वाघ, बिबट, हत्ती अश्या मोठ्या प्राण्यांचाच यात विचार होतो. पक्षी, साप, फुलपाखरे व कीटक यांचा तर अजून विचारही झाला नाही. सन १९५२ मध्ये भारतातून चित्ता नामशेष झाला. नुकताच माळढोक पक्ष्यासह १९ प्राणी व पक्ष्यांच्या प्रजाती महाराष्ट्रातून नामशेष झाल्याचे वृत्त आले. तिकडे सारस पक्ष्यांची संख्याही बोटावर मोजण्याइतकी झाली आहे. निसर्ग संतुलनात महत्वाची भूमिका असलेल्या जैवविविधतेला अनेक धोके आहेत. शिकार, गुरेचराई, वनवनवा, वृक्षतोड, मानवाचा हस्तक्षेप ई, कारणामुळे वाघाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. उदाहरण दाखल संपूर्ण मेळघाट परीसरातील ३०९ गावांचा पूर्ण ताण मेळघाटच्या जंगलावर आहे. एके काळी गाविलगड टेकड्या व मेळघाट परिसरात वाघांची प्रचंड संख्या होती. आज मात्र समृद्ध वारसा असलेला या प्रदेशात ‘वाघ ते वाळवी’ या नात्यात अडसर निर्माण होत आहे. पर्यायाने जंगलातील अन्नसाखळी विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्र वन विभागाच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ‘शिकार प्रतिबंधक दल’ आणि सी.बी.आय. समवेत वाघाच्या शिकार प्रतिबंध कारवाईत सहभागाचा योग आला. मध्यप्रदेश व छत्तीसगड मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे ‘शिकार प्रतिबंधक दल’ आणि सी.बी.आय. यांच्या संयुक्त कारवाईत वाघांच्या शिकाऱ्यांना पकडण्यात आले. मोठ शिकाऱ्यांच जाळ असलेल्या शिकाऱ्यांच्या ह्या टोळ्यांनी आजवर अनेक वाघांची शिकार केली. आपल्या जैवविविधतेला नुसता शिकार हाच धोका नाही तर अनेक दुर्मिळ वनौषधीची देखील तस्करी केली जाते. मध्यप्रदेश मधील वास्तव या दृष्टीने अधिक महत्वाचे वाटते. जैवविविधता कायदा २००२ अंतर्गत पहिल्यांदा मध्य/प्रदेश सरकारने गुन्हा नोंदविला. अनेक वर्षापासून होत चाललेली वनस्पती तस्करी यातून थांबण्यास मदत झाली. भारतातील अनेक जंगलात आजही अस्वल, सांबर, चितळ, ससा, अश्या अनेक प्राणी, पक्षी व सापांचीही शिकार होत असल्याची माहिती आहे. खवले मांजर प्राण्याची तस्करीची उघडकीस आलेली अलीकडील घटना बरच काही सांगून जाणारी आहे. आपल्या वाढत्या लोकसंखेचा ताण आपल्या जंगलांना व तेथील जैवविविधतेला आता असह्य होत आहे. पण मुक्या जंगलाच, प्राणी, पक्षी याचं ऐकणार कोण? माणूस आपल्या अति हव्यासापोटी शेखचिल्ली सारखा वागायला लागलाय. वन्यजीव व पर्यावरण संवर्धनासाठी आमच्या सारख्या वन्यजीव संरक्षांचे प्रयत्न फारच तोटके पडताहेत. भारतातील व महाराष्ट्रातील अनेक जंगलांतील वनवनवा हा मानवनिर्मित असल्याचे आपण पाहतो आहे. स्थानिक लोकांनी अज्ञान आणि चिडखोर प्रवृत्तीने जंगलाला आग लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात जैविविधतेचा ऱ्हास होतो. पण हे सगळा आमच्या बुद्धीच्या पलीकडलं आहे. निसर्गाधीष्ठीत वन्यजीव व पर्यावरणाला अनुसरून असलेली शहरी मानवांची जीवनशैली आता कायमची बदलली आहे. आता तर आदिवासींचीही जीवनशैली देखील उपभोगग्रस्त संस्कृतीकडे वाटचाल करीत आहे. मेळघाट व सातपुड्यातील इतर परिसरात वाघांच्या शिकारीत असलेला त्यांचा सहभाग मनात खूप काही प्रश्नचीन्ह निर्माण करणारा आहे. आदिवासी समुदायाची रक्षकाची भक्षक होण्याच्या मार्गाने चाललेली वाटचाल मनाला फार चटका देणारी आहे. आज जी जंगले टिकून आहेत ती केवळ ज्यांना कायद्याने संरक्षनाचा दर्जा प्राप्त झाला ते व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये यांच्या मुळेच आहेत. कारण ज्या ज्या ठिकाणी जंगलाला व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये अश्या स्वरूपाचा दर्जा मिळाला नाही त्या परिसरातील सगळे जंगल खाण्यात स्थानिक समुदाय कुठेच मागे दिसत नाही. हेही वास्तव फार बोलके आहे. अश्याच पद्धतीने जैविविवधेतचा ऱ्हास होत राहिला तर येथील पक्ष्यांचा किलबिलाट अन वाघाची डरकाळी कायमची हवेत विरेल की काय अशी शंका मनात आल्या शिवाय राहत नाही.

एकंदरीतच मानव व वन सह्जीवनाचा हा प्रवास विनाशाच्या उंबरठ्याकडे जातोय ही अनुभूती मानवाला व्हायला लागली. माणसांना उशिरा का होईना शहाणपण सुचायला लागले. मात्र प्रयत्न अजूनही तोकडेच आहेच. यासाठी संभावित धोके ओळखून मानव व वन्यजीवन यांच्या सहजीवनाचे महत्व नव्याने पेरण्याची आज गरज निर्माण झाली. माणसाला अनुभूती झाली की, ‘वन्यजीवन जगले तरच आपलं अस्तित्व राहणार’ सबब ‘वन्यजीव संवर्धन काळाची गरज’ असा सूर आवळायला सुरवात झाली. खर तर मानवाने मानवाच्या संवर्धनासाठी उचलेले हे पाउल आहे. यातूनच भविष्यातील मानवाची ‘दीन’ परिस्थिती टाळण्यासाठी मानवाने ‘दिन’ व ‘सप्ताह’ साजरे करण्यास सुरवात केली. दि.२१ मार्च हा जागतिक वन दिन तर ऑक्टोबर महिन्याचा पहिल्या आठवड्याचं ‘वन्यजीव सप्ताह’ म्हणून बारसं करण्यात आलं.  यातूनच आज अश्या सप्ताहांना व दिवसांना उत्सवाचे स्वरूप आले आहे. नुकताच वन विभाग, स्वयंसेवी संस्था व निसर्गप्रेमी यांनी ‘जागतिक वन्यजीव सप्ताह’ साजरा केला. महाराष्ट्रातही १ ते ७ ऑक्टोबर या काळात साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवात सर्व सहभागी झाले आहेत. मात्र सामान्य माणूस आजही यात कुठेच सक्रीय दिसत नाही. कोणे एके काळी जंगलाचा अविभाज्य घटक असलेला मानव मात्र या नात्याची वीण घट्ट ठेवण्यात सपशेल अपयशी ठरला आहे. कालानुरूप तो जंगलातील भूस्थित परिसंस्था व जैवविविधतेचा घटक न राहता आता नागरी परीसंस्थेचा घटक झाला. नवल म्हणजे आता मानव आणि वन्यप्राणी यांचा संबंध कमी कमी होत चालला आहे. हा संबंध आता फक्त मानव वन्यजीव संघर्षापुरताच उरला आहे. आजचा वनवर्तमान अस्वस्थ करणारा आहे. वाघ ते वाळवी दरम्यान प्रत्येक सजीव कमीअधिक प्रमाणात संकटात सापडला आहे. वन्यप्राणी अधिवास अवनती व ऱ्हास, वन्यप्राण्यांनी मनुष्यवस्त्यावर येऊन अतिक्रमण केलय की माणवाने वन्यप्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण केलंय? याचा विचार आपणच या निमित्ताने करने गरजेचे आहे. हा संघर्ष कमी करणेसाठी नक्की काय करावे याचा उहापोह होणे अपेक्षित आहे. हारतुरे, कार्यक्रम, छायाचित्रे, भित्तीपत्रके, फेऱ्या व बातम्या यापलीकडे जाऊन प्रत्यक्ष काम होण्याची गरज आहे. जिथे वाघ आहेत तिथे जनजागृती व स्थानिकांचा वास्तववादी सहभाग वाढविणे गरजेचे आहे. तसेच प्रदेशनिहाय जंगल व तेथील जैवविविधता संवर्धन होणे अपेक्षित आहे. पृथ्वीवर जसा मानवाचा अधिकार आहे तशीच पृथ्वी वन्यप्राण्यांची सुद्धा आहे हा शाश्वत विचार आपल्या विद्यार्थी व युवा पिढीमध्ये रुजविण्यात आपण हातभार लावणे गरजेचे आहे. अति वनपर्यटनाचा त्रास जंगलाला व तेथील वन्यजीवाना होऊ नये यासाठी कडक नियम व त्यांची अंमलबजावणी अपेक्षित आहे. मानव आणि जंगल व त्यातील वन्यप्राणी यांचे शक्य असलेले सहजीवन अपेक्षित आहे. दर दिवसाला जगात आजच्या घडीला १६० हेक्टर तर भारतात ३५ हेक्टर जंगलतोड होत आहे. म्हणजेच ऑक्सिजन निर्माण करणारी एक मोठी नैसर्गिक शक्ती आम्ही उधव्स्थ करतोय. भविष्यात पैसेकाढण्यासाठी असलेले ए.टी.एम.सारखी ऑक्सिजन केंद्र लागल्यास नवल वाटण्याचे काहीच कारण नाही. जगातील प्रत्येक व्यक्ती आपले आधुनिक जीवन जगण्यात व्यस्त आहे. स्वतच्या जीवनशैलीत मग्न झालेल्या मानवाला कसलेच भान उरले नाही. हे विदारक वास्तव मन सुन्न करनारे आहे. आज पृथ्वीवरील सगळीच जंगले संकटात सापडली आहेत. सदाहरित वने, शुष्क व आर्द्र पानगळ वने, खारफुटी वने अश्या जगातील २१ प्रकारच्या जंगलांना एकाच मानव प्रजातीने जेरीस आणलंय. शासन तसेच स्वयंसेवी संस्था व व्यक्ती आपल्या आपल्या स्तरावर प्रयत्न करीत आहेत मात्र जंगल विनाशाचा वेग खूप जास्त आहे. याउलट जंगल निर्मितीचे प्रयत्नही तोकडे पडत आहेत. स्थानिक जनतेला याचा गंधही नसावा याहून भयंक दुर्दैव दुसर असूच शकत नाही. शाषन आपल्या स्तरावर शतकोटी वृक्षलागवड योजना व हरित सेनेची माध्यामतून प्रयत्नरत आहेत. मात्र याची संख्यात्मक प्रगतीची वाटचाल शाश्वत प्रगतीकडे होईल यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्या संस्कृतीत झाड, प्राणी व पक्ष्याचा उल्लेख आहे. वन व वन्यजीव संवर्धन हा उद्देश ठेऊन आपल्याशी प्राणी व पक्षी जोडल्या गेलेत. म्हनुणच वनसंवर्धनाच्या विचाराची पेरणी आपण आपल्या मनात करुया. आपले मित्र, नातेवाईक व विद्यार्थी यांच्याशी असलेले निसर्गाचे नाते पुन्हा नव्याने घट्ट करण्यासाठी सुरवात करूया. चला तर नव्याने जंगलाशी नाते जोडूया. जंगल जगवूया म्हणजेच आपण जगूया….!

@ यादव तरटे पाटील 

दिशा फाउंडेशन, अमरावती

संपर्क – ९७३०९००५००

disha.wildlife@gmail.com

www.yadavtartepatil.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *