पक्ष्यांनो परत फिरारे….

सहजीवन, सहअस्तित्व हा जैवविविधतेमधला अविभाज्य घटक आहे. याच अर्थाने निसर्गातील प्रत्येक वनस्पती व प्राणी महत्त्वाचे आहेत. वन, वन्यप्राणी, पक्षी, फुलपाखरे, जलसंपदा व शेती एकमेकांच्या आधारावर आहे. मात्र या अन्नसाखळीतील वन्यप्राणी, पक्षी, कीटक हा घटक नकोसा वाटायला लागणे ही दुर्दैवी बाब आहे. एकमेकांचे अस्तित्व टिकवितांना इतर प्रजातींना नष्ट करण्याची भूमिका कितपत योग्य..? ज्या जैवविविधतेतील आपण एक घटक असतांना त्याच जैवविविधतेतील इतर घटकांचा त्रास होतोय ही भूमिका आपण घेणे हेही कितपत योग्य…? वन्यप्राण्यांची शिकार, मानवाचे वनअतिक्रमण, निर्वनीकरण, लोकवस्त्यामध्ये वन्यप्राण्यांचा संचार, प्राणीपक्ष्यांपासून शेतपिक नुकसान, मानवावर होणारे वन्यप्राण्यांचे हल्ले ई. बाजू या निमिताने पुढे येतात. आधीच बेजार झालेला शेतकरी त्यात वन्यप्राण्यांचा संचार यात तो होरपळला जात असतानांच अन्नसाखळीत प्रत्येक वन्यप्राण्याचे महत्त्व असल्याने त्यांच्या संवर्धनाची मोहीम निसर्गप्रेमी चालवत आहेत. हा मानव वन्यजीव संघर्ष एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे. हा केवळ वन्यप्राण्यापुरताच मर्यादित ठेवणे योग्य होणार नाही. मानवाचा पक्षी व इतर घटकावर असलेली वक्रदृष्टी हाही याचाच एक भाग आहे. वन्यप्राणी व मानव यात सबळ कोण..? कधी वाघ, अस्वल बळी ठरतो तर कधी माणसाला आपले प्राण गमवावे लागतात. मात्र मानव व पक्षी यात मात्र आजवर पक्षीच दुबळा ठरलाय. हा एकाकी लढा पक्ष्यांचा केवळ जीवावरच उठला नाही तर यातून अख्खी प्रजातीच संपुष्टात येत आहे. गिधाड, माळढोक, तनमोर, तितर, बटेर यांच्यासह अनेक पक्षी या एकाकी संघर्षाचे आजवर बळी ठरले आहेत.

गवताळ प्रदेश म्हणजे एक स्वतंत्र अधिवास जेथील मृदेवर गवतांच्या असंख्य प्रजातींचे राज्य असते. जाड, पातळ, विरळ तर काही ठिकाणी दाटीवाटीने वाढलेले गवत आपल्याला दिसते. गवताळ प्रदेश पृथ्वीवरील मुख्य अधिवासापैकी एक आहे. पृथ्वीचा एकूण भूभागाच्या ४०% भाग हा गवताळ प्रदेशाने व्यापलेला आहे. पण वाढणारे शेती व शहरक्षेत्र यातून गवताळ प्रदेश नष्ट होत आहेत. गवताळ प्रदेशातील अन्नसाखळीच्या सर्वोच्च स्थानावरील चित्ता आपण सन १९४८ मध्येच गमविला. गेल्या सत्तर वर्षात भारतातील बदलेली परिस्थिती आपण पाहतोय. कीटकांमध्ये मुंगी ही सर्वत्र आढळते. जगभरातील ४०००० प्रजातींपैकी सुमारे १४००० या फक्त गवताळ भागात आढळत्तात. गवताळ जमिनीच्या सूक्ष्म व्यवस्थापनाची जबाबदारी मुंग्या इमाने इतबारे पार पडतात. नाकतोडा, नमस्कार कीटक, काजवा, माशी, मधमाशी, गांधीलमाशी, फुलपाखरे व इतर कीटक परागीकरण करतात. यातील अनेकजण अंडी गवतावर घालतात, तेच त्यांच खाद्यही आहे. यातील फक्त शेणकिड्याचे उदारण घेऊया. शेणकिडा शेणाचा गोळा करून त्यात अंडी देतो. पिलांच्या पालनपोषणाकरिता जमिनीत खड्डे खणून त्यात शेणाचा गोळा ठेवतात. सस्तन प्राण्यांच्या विष्ठेचे व्यवस्थापन व विघटन ही भूमिका यातून स्पष्ट होते. मातीच्या पोषक घटकांचे पुनर्नवीकरण यातून होते. शेणकिड्यासारख्या किटकावर जगणारे गवताळ प्रदेशातील पक्षी यादृस्तीने महत्वाचे आहेत. माळढोक, तणमोर व इतर शिकारी या साखळीत महत्वाची भूमिका बजावतात.

माळढोक पक्षी तर गवताळ प्रदेशाचा उत्तम निर्देशकच आहे. एकेकाळी हा पक्षी भारतीय राष्ट्रीय पक्षी होण्याच्या स्पर्धेत होता. आय.यु.सी.एन.च्या तांबड्या यादीत अत्यंत दुर्मिळ प्रजाती असलेला माळढोक आता शेवटच्या घटका मोजत आहे. माळढोकाला इंग्रजीत ‘ग्रेट इंडियन बस्टार्ड’ तर चंद्रपूर जिल्ह्यात हुम, अकोला जिल्ह्यात ढोक, तर यवतमाळ जिल्ह्यात भांडेवडी नावाने ओळखले जाते. इतर पक्ष्यांच्या तुलनेत धिप्पाड व मोठे शरीर, उंच पायामुळे हा शहामृगासारखा दिसतो. भारतातील कोरड्या माळरानांवर एकेकाळी सहज दिसणाऱ्या ह्या पक्ष्यांची संख्या सन १९६९ मध्ये १,२६०, १९७८ मध्ये ७४५, २००० मध्ये ६००, २०१० मध्ये ३०० तर २०११ मध्ये केवळ २५० इतकी असल्याचा अंदाज करण्यात आला होता. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची मधील या पक्षाचे मुख्य खाद्य लहान व मोठे किडे, नाकतोडे, बीजे असून हा मिश्राहारी प्रकारात मोडतो. महाराष्ट्रात सन २०१७ मध्ये भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून, बी.एन.एच.एस. च्या वतीने सर्वेक्षण केले. आपल्या राज्यात ३१ पथकाद्वारे ही पाहणी करण्यात आली. या सर्वेक्षणात माळढोक पक्षी आढळला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. माळढोक राजस्थान,गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यात आढळतो. मात्र महाराष्ट्रातील सोलापूर, नागपूर, चंद्रपूर, अहमदनगर, बीड जिल्ह्यात त्याचे अस्तित्व धुसर झाले आहे. नुकताच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भागात असल्याची माहिती आहे. या पक्ष्याला पर्सिध्द शास्त्रज्ञ विगर्स यांनी १८३१ मध्ये जगासमोर आणले. नर पक्षी माद्यांना आकर्षित करण्यासाठी दरवर्षी एका विशिष्ट जागी उभा राहून आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करतो. डौलदार नृत्य करून स्वत:भोवती गिरकी घेतो, शेपूट उंचावतो आणि ‘हुम्म’ असा आवाज काढतो. हा आवाज २-३ किमी अंतरापर्यंत ऐकू जाऊ शकतो. हा पक्षी बहुभार्या आहे. एक नर अनेक माद्यांशी मीलन करतो. मीलनानंतर मादी निर्जन ठिकाणी उघडय़ा जमिनीवर एक अंडे घालते. सुमारे २५ दिवसांनंतर अंडय़ातून पिल्लू बाहेर येते. पिल्लू ७५ दिवसांनी उडण्यासाठी सज्ज होऊन एक वर्षानंतर आईपासून स्वतंत्र होते. पण हा दीर्घकाळ चालणारा विणीचा हंगाम पिल्लांसाठी घातक ठरतो. अंडी उबवणीचे २५ दिवस, उडायला येईपर्यंतचे ७५ दिवस असे तब्बल १०० दिवस यात खर्ची होतात. यामुळे जन्माला आलेल्या सर्व पिल्लांपैकी सुमारे ५०% पिल्ले या दरम्यान मृत्युमुखी पडतात. भयाण वास्तव असे की फक्त २५% पिल्लेच प्रौढ होईपर्यंत जगतात.

विकास प्रकल्प, विजेच्या तारांना धडकून होणारे अपघाती मृत्यू, कीटकनाशकांमुळे होणारी विषबाधा, भटक्या कुत्र्यांकडून होणारी पिल्लांची व प्रौढ पक्ष्यांची शिकार, गुरांच्या पायदळी तुडवले जाण्यामुळे होणारा अंडय़ांचा व पिल्लांचा नाश, अधिवास धोक्यात येणे यामुळे हे पक्षी धोक्यात आलेत. नष्ट होणारा अधिवास ही सर्वात जटिल समस्या आहे. शेती आणि उद्योगधंद्यासाठी माळरानांचा मोठय़ा प्रमाणात नाश होत आहे. माळरानांच्या अयोग्य आणि अशास्त्रीय नियोजनामुळे ती आता संपुष्टात येत आहे. माळढोक पक्ष्याच्या आधाराने येथील जैवविविधता सुखाने नांदत असतांनाच मात्र आता या जंगलाला मानवाची दृष्ट लागली आहे. आज येथील माळढोक शेवटच्या घटका मोजत आहे. वन विभागाच्या व स्थानिक वन्यजीवप्रेमीच्या प्रयत्नांना येथे सपशेल अपयश आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. करोडो रुपये खर्च करूनही आम्ही माळढोकाला वाचविण्यात अपयशी ठरलो आहे. ही बाब मानाला चटका देणारी असून आत्मचिंतन करायला भाग पडणारी आहे. एकूणच काय तर मनुष्याचा हस्तक्षेप नसलेला अधिवास व शिकाऱ्यांपासुन संरक्षण मिळाले तर येथेही नव्याने माळढोकाचा संसार फुलायला लागेल यात शंकाच नाही.

गवताळ प्रदेश किंवा माळरान हा मानवी जीवनमानाशी निगडीत महत्वपूर्ण व मोठे अधिवास क्षेत्र आहे. सुमारे ८०० दशलक्ष माणसे यावर अवलंबून आहेत. सोबतच चारा व अन्नाचे स्रोतही आहेतच. पाणी आणि कार्बन साठविण्याच्या बहुमूल्य कार्यात सुद्धा हा भाग आहेच. माणसाच्या अस्तित्वाशी निगडीत शेती यावर अवलंबून आहे. नव्याने होणारी शेती लाखो वर्षापासून गवताळ अधिवासांना नष्ट करित आहे. विशेष म्हणजे पिकांवर पडणाऱ्या किडींचे रक्षण करनारे पक्षीही यात बळी ठरत आहेत. धाविक, चंडोल, खाटीक, कोतवाल, वटवट्या, शिंपी, गोजा ई. पक्षी किडींचे व्यवस्थापन करतात. शेत पिकांना उपद्रवी असणारे उंदीर व घुशीचा बंदोबस्त शिकारी पक्षी करतात. एकूणच पक्ष्यांची पर्यावरण संतुलनात महत्वाची भूमिका आहे. महाराष्ट्रात आजवर ५५७ पक्ष्यांची नोंद झाली आहे. भारतातील १२८४ पक्ष्यांचा तुलनेत ४३ % पक्षी महाराष्ट्रात आढळतात. गवती अधिवासातील आणखी एक महत्वाचा पक्षी म्हणजे तनमोर होय. कुंदा जातीच्याच गवतावर घरटी करणारा तनमोरही संकटात आहे. वाशीम जिल्ह्यातील काही भागातच तो आता शिल्लक राहिलाय. शेतशिवारातील रसायनांच्या संपर्कात येणाऱ्या पक्षांवर विपरित परिणाम होत आहेत. त्यांची दिशादर्शक यंत्रणा बिघडून त्यांना श्वसन संस्थेचे विकार होतात. अंड्याचे कवच ठिसूळ होते. आजारपणामुळे माद्या पिलांना सोडून देतात. विदर्भातील तितर व लावा या शेतशिवारतील पक्षांची संख्याही शिकारीमुळे आता झपाट्याने कमी होत आहे.

वन्यप्राण्यांच्या प्रेमाच्या बाबतीत आपल्याकडील दुटप्पीपणा घातक ठरतोय. याचा आता अतिरेक होतोय. त्यातील वाघ एक उत्तम उदाहरण आहे. फक्त आशियायी देशात आढळणाऱ्या वाघाबद्दल संपूर्ण जगाला कुतूहल आहे. त्याला टिकवण्यासाठी भारतात आजवर ५० व्याघ्र प्रकल्प उभारण्यात आले. सन २०१६ मध्ये त्यांच्या संवर्धनासाठी १५००० कोटी रुपयांची तरतूद केल्या गेली. अनेक जागतिक संस्थाही याला पाठिंबा देत आहेत. अर्थात यात वाईट काहीच नाही, पण वाघाबरोबर इतरही प्राणी व पक्षी आहेत, त्यांच्याविषयी व त्यांच्या संवर्धनाविषयी कोणीच काही बोलत नाही. गिधाड, माळढोक यांसारखे पक्षी तर आता पूर्णपणे नामशेष होत असतांनाच त्यांच्याविषयी प्रेम किंवा ओढ लोकांना का वाटत नसावी..?  एखाद्या प्राण्याविषयी प्रेम असणं, त्यांच्यासाठी काही करणं यात वाइट असं काहीच नाही. तुम्ही जंगलं तोडली, त्यांचा अधिवास धोक्यात आणला. हे पक्षी आज बेघर झालेत. पुढच्या काळात तर ते पृथ्वीवरून नष्टदेखील होतील, मग त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी ही आपली आहे. पण ही जबाबदारी निभावताना हे प्राणीप्रेम फक्त काही प्राण्यांपुरता मर्यादित न ठेवता इतरही जीवांचा त्यात विचार केला गेला पाहिजे. त्यासाठी सरकारनेही कडक कायदे करावे व अस्तित्वात असलेल्या कायद्यांची कडक अंमलबजावणी करावी. मानव वन्यजीवांच्या या वादाचे रुपांतरण संवादात झाल्यास मानवासह इतर जैवविविधता सुखाने नांदेल. या भूमिकेतून आपण याकडे पाहिलं पाहिजे. या नात्याचे वस्त्र आता सहजीवनाचा धाग्याने नव्याने विणायची गरज आहे.

@ यादव तरटे पाटील

दिशा फाउंडेशन, अमरावती

disha.wildlife@gmail.com

www.yadavtartepatil.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *