वाघाचे चान्स एन्काऊंटर कळले असते तर…!
जगात वाघांचा देश असलेला भारत अशी आजही आपल्या देशाची ओळख आहे. वाघांच्या देशात सगळीकडे मानवाची चलती असतांना एक उपेक्षित वाघिणीचा मृत्यू झाला खरा पण हा मृत्यू अनेक अंगाने मनाला चटका देणारा ठरलाय. म्हणूनच अनेक अंगाने या सर्व प्रकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्र तसेही वाघांच्या दृष्टीने गेल्या काही वर्षात चर्चेचा विषय ठरला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील टी-२७ नावाची वाघीण आपल्या तीन पिल्लासह सुखाने नांदत होती. हळूहळू पिल्ले मोठी व्हायला लागली. पिलांना वाघीण शिकार कशी करायची हे नैसर्गिक शिकवण देत असतानाच आईपासून एक वयात येणार पिल्लू भरकटलं. अन खरा खेळखंडोबा इथूनच सुरु झाला. वाघाची पिल्ले वेगळी झाल्यानंतर शिकार करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. ‘सबळ असेल तोच टिकेल’ या उक्तीनुसार ही किमान दीड ते दोन वर्ष वय असलेली वाघीण सुद्धा शिकार करण्यासाठी सरसाऊ लागली. मग वाटेत येईल ते मारण्याचा प्रयत्न करू लागली. एकीकडे व्याघ्र संवर्धन अन दुसरीकडे मानवाचा व्याघ्र अधिवासात वाढता वावर याच संघर्षातून वाघाच्या अधिवासात आलेल्यावर वाघीण हल्ला करायला लागली. हे सर्व हल्ले या टी-१ वाघिणीने शिकार करण्यासाठीचे प्रयत्न (चान्स एन्काऊंटर) यातून केलेत. एकीकडे ‘प्रयत्न प्रमाद’ पद्धतीने वाघीण एक एक शिकारीचे प्रयत्न करीत गेली. तर दुसरीकडे नरभक्षक वाघीण म्हणून तिच्यावर शिक्कामोर्तब होणे सुरु झाले. म्हणूनच ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातून बोर अभयारण्यात सोडलेल्या वाघिणीच्या मृत्युदंडावर न्यायालयाची मोहोर उमटली. यानंतर वन विभाग व वन्यजीवप्रेमींची भूमिका, वने आणि वन्यजीव व्यवस्थापनाची दिशा अशा अनेक अंगाने चर्चा सुरु झाली. मध्यप्रदेश मध्ये वाघांच्या सुटकेबाबतचे प्रयोग यशस्वी होत असताना, महाराष्ट्रात मारण्याची वेळ का यावी? ‘नरभक्षक’ ठरवून वाघाला बदनाम तर केले जात नाही ना यावर खऱ्या अर्थाने विचारमंथन करण्याची वेळ आली आहे.
वास्तविकतः टी-१ वाघिणीला तिच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्याआधी तिच्या यापूर्वीच्या वर्तणुकीचा व भविष्याचा अभ्यास करूनच सुटकेचा आराखडा तयार करायला हवा होता. प्रयोगाच्या यशस्वितेसाठी तीन महिन्यांपासून तर सहा महिन्यांपर्यंतचा कालावधीसुद्धा लागू शकतो. त्यामुळे प्रयोगात राबवणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये प्रशिक्षण, क्षमता, कौशल्य व सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यातला संयम अधिक महत्त्वाचा आहे. वन्यप्राणी व त्यांची वागणूक, या प्रकारच्या प्रयोगासाठी लागणाऱ्या तांत्रिक बाबी कळणारे अधिकारी हवेत. वाघिणीला ‘रेडिओ कॉलर’ लावल्यानंतर देखरेखीसाठी एक चमू वाघाच्या मागे नव्हे तर त्याच्या समोर असायला हवी. या प्रकरणात देखरेख ठेवणाऱ्या चमुने घेतलेला मागोवा तिच्या भटकंती तसेच आक्रमक भटकंतीसाठी कारणीभूत ठरला. ‘रेडिओ कॉलर’ लावल्यानंतर उपग्रहावरुन संकेत येत असतात. यासाठी वाघाच्या मागे फिरण्याची गरज नव्हती. माणसांचा मागोवा लागल्याने वाघीण पुढेपुढे सरकत गेली. तिला सोडलेल्या क्षेत्रात शिकार असूनही तिला शिकार करता आली नाही. त्यामुळे वाटेत येणारा मग जनावर असो वा माणूस त्या प्रत्येकावर ती हल्ला करत गेली. अंदाजे १५० ते २०० लोकांचा ताफा, वाहने तिच्या मागे फिरत होती. त्यामुळे कोणत्याही एका ठिकाणी तिला स्थायिक होता आले नाही. अशा प्रकारच्या प्रयोगांमध्ये वाघाला स्थायी होण्यासाठी किमान तीन महिने लागतात. अशा वेळी संयम बाळगणे जास्त महत्त्वाचे ठरते. या वाघिणीने तिच्या नैसर्गिक शिकारीची क्षमता गमावलेली नव्हती, पण तिला नैसर्गिक शिकार करण्यासाठी पोषक वातावरण मिळाले नाही. यामुळे वन्यजीव व वनव्यवस्थापन यावर कायमस्वरूपी काम करण्याची गरज पुन्हा निर्माण झाली आहे. जंगलाची संलग्नता, वन्यप्राण्यांच्या भ्रमंतीचा मार्ग पुनर्जीवित करण्याची गरज प्राधान्याने निर्माण झाली आहे. नाही तर मानव-वन्यजीव संघर्ष वाढतच जाईल. प्रत्येक वेळी नव्याने वाघाचा बळी जात राहील. वाघिणीच्या मृत्युदंडावर न्यायालयात शिक्कामोर्तब झाले तरी सुद्धा न्यायालयाने वनखात्याला एकदा नव्हे तर दोनदा फटकारले आहे. व्यवस्थेने वाघाला ‘नरभक्षक’ ठरवले, पण प्रत्यक्षात काय? कायद्यात भलेही नरभक्षक वाघाला गोळय़ा घालून ठार मारण्याची तरतूद आहे, पण ‘नरभक्षक’ची मूळ व्याख्या काय? माणूस दिसल्याबरोबर वाघ त्यावर हल्ला करून मारत असेल तर ठीक, पण येथे ही वाघीण जनावरेही मारत होती. या प्रकरणात तर तिला नरभक्षक’ ठरवून मृत्युदंडाच्या शिक्षेस पात्र ठरवले खरे पण तीही बिलंदर, शेवटपर्यंत या व्यवस्थेच्या हाती लागली नाही. येथेही गुढ कायम ठेऊनच तिने श्वास मोकळा केला.
‘टी-१’ या वाघिणीला ठार मारण्याऐवजी तिला बेशुद्ध करून पिंजऱ्यात टाकण्याचा पर्याय होता, पण शेतातील पिके, वाढलेले गवत हे सर्व आव्हानात्मक होते. ‘ट्रँकुलायजिंग’ बंदुकीने वन्यप्राण्याला बेशुद्ध करताना गवताचे पाते जरी आडवे आले तरी तो डार्ट दुसरीकडे वळतो. वन्यप्राणी खुल्या वातावरणात असेल तरच ते शक्य आहे. तसेच या बंदुकीची क्षमता १०० ते १२५ फूट अंतरावरची आहे. अधिक अंतरावर डार्ट जात नाही. येथे मोठ्या संयमाची गरज असते. ’राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानाचे अशा प्रयोगासंदर्भातले निकष ठरवून दिले आहेत. या निकषांची महाराष्ट्रात अधिक गांभीर्याने पूर्तता होणे आवश्यक आहे. प्राधिकरणाच्या निकषांचे पालन व नियोजनबद्ध आखणी यामुळे मध्यप्रदेश मध्ये प्रयोग यशस्वी ठरत आहेत. महाराष्ट्रातील वनाधिकाऱ्यांपासून तर कर्मचाऱ्यांपर्यंत हे व्यावसायिक कौशल्य वाढवण्याची गरज आहे. रेडिओ कॉलर लावल्यानंतरही गेल्या दहा महिन्यांत दोन वाघांचा मृत्यू विद्युत प्रवाहाने झाल्यामुळे रेडिओ कॉलरींगच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उमरेड करांडला अभयारण्यातील ‘जय’ या वाघाला कॉलर लावली असताना त्याचा ठावठिकाणा लागला नाही. ‘जय’चा वंशज असलेल्या ‘श्रीनिवास’ या वाघालासुद्धा रेडिओ कॉलर असताना त्याचाही मृत्यू विद्युत प्रवाहाने झाला. आता ‘टी-१’ या वाघिणीचा मृत्यूदेखील विद्युत प्रवाहाने झाला. त्यामुळे हे अपयश कॉलरिंग प्रणालीचे की प्रणाली हाताळणाऱ्या यंत्रणेचे यावर आता खलबते सुरू झाली आहेत.
ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील ‘टी-१’ या वाघिणीला रेडिओ कॉलर लावून २९ जुलैला बोर अभयारण्यातील नवरगाव क्षेत्रात सोडण्यात आले होते. तेव्हापासून तिच्यावर देखरेख ठेवणारी व गावकऱ्यांना जागृत करणारी असे दोन चमू कार्यरत होते. कॉलरचे संकेत ठराविक कालावधीनंतर मिळत असतानासुद्धा देखरेख करणारा चमू सातत्त्याने तिच्या मागे होते. माणसांच्या मागोव्यामुळे ती पुढे पुढे गेली. अमरावती जिल्ह्यातून नागपूर जिल्ह्यातील नरखेड तदनंतर कोंढाळीत आलेल्या या वाघिणीवर देखरेख करणारा चमू बदलली. त्यांनी वाघिणीचा मागोवा घेताना ठराविक अंतरावरूनच तिच्यावर पाळत ठेवली. परिणामी त्या चार दिवसात वाघिणीबाबत कोणताही गोंधळ झाला नाही. वर्धा जिल्ह्यात परतताच पुन्हा एकदा फटाके फोडून त्या वाघिणीला परतावण्याचा प्रयत्न सुरू झाल्यामुळे नवरगावातून तिने काढता पाय घेतला. अन घात झाला, ती विद्युत प्रवाहाचा बळी ठरली. ऑगस्ट महिन्यात गडचिरोली जिल्ह्यतील चपराळा अभयारण्यात आरमोरीची वाघीण रेडिओ कॉलर लावून सोडण्यात आली होती. या वाघिणीच्या सुटकेलासुद्धा दोन महिने होत आहेत, पण तिच्याबाबत गेल्या दोन महिन्यात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. सुरुवातीपासून चपराळा वनखात्याच्या देखरेख चमुने वाघिणीपासून अंतर राखले. मध्य चांदा विभागातील विठ्ठलवाडा, नंतर धाबा येथे वाघीण आल्यानंतर दोन चमू एकत्र आल्या. येथून ही वाघीण प्राणहिता, मध्यचांदा असा प्रवास करत गडचिरोली, चामोर्शी येथे पोहोचली. वाघिणीच्या या संपूर्ण भ्रमंतीदरम्यान या परिसरातील गावांमध्ये विद्युत प्रवाहाचा धोका लक्षात घेऊन देखरेख चमूने रात्रीच्या वेळी गावातील वीज बंद ठेवण्याची विनंती विद्युत विभागाला केली. त्याचवेळी वाघिणीपासून सुरक्षित अंतर राखूनच हा चमू तिच्यावर पाळत ठेवून होती. एकीकडे गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात कॉलर लावलेल्या वाघिणीबाबतचा प्रयोग यशस्वी होत आहेत. हीच पद्धती बोर मधल्या वाघिणीबाबत राबवली असती तर वाघिणीच्या मृत्यूची वेळ आली नसती. गफलत व अभ्यासाचा अभाव वाघिणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. तसही माणसांचा सहवास हा नेहमीच वन्यप्राण्यांच्या बदलणाऱ्या वर्तणुकीसाठी कारणीभूत ठरतो. या ‘चान्स एन्काऊंटर’ चे गमक कळण्यापूर्वीच सुमारे ७०० किमीचा प्रवास केलेल्या वाघिणीने कायमचा निरोप घेतलेला होता. व्याघ्रकेंद्रित व्यवस्थेचे हे अपयशच म्हणावे लागेल. म्हणूनच आता शाश्वत व्याघ्र उपयोजना करणे गरजेचे वाटते.
@ यादव तरटे पाटील
दिशा फाउंडेशन, अमरावती
disha.wildlife@gmail.com
www.yadavtartepatil.com