Categories: ArticleNature

जिंदगी के बाद भी…..!

जिंदगी के बाद भी…..!

जन्म व मृत्यू हे दोन शाश्वत सत्य आहे. याच सत्याभोवती आपलं जीवन घुटमळत असतं. जन्म-मृत्यूमधील पोकळी म्हणजेच आयुष्य आहे. जन हा जैवविविधेतला एक घटक आहे. जैवविविधता, जल, जंगल आणि जमीन यांच निसर्गचक्र महत्वपूर्ण आहे. नैसर्गिक मृत्यू या संकल्पनेचा आपण विचार केल्यास मृत पावलेल्या जिवाच्या विघटणाची व्यवस्था निसर्गाने केलेलीच आहे. जंगलात वाघ मरतो, तोही कुजतो, मुंगी मरते, तीही कुजतेच, त्यांच्या कुजण्याची प्रक्रिया करणारे सुक्ष्मजीव व कीटकही आहेतच. सतत मृत पावणे अन कुजणे, कुजण्यातून वनस्पतींना उर्जा देणे अन पुन्हा प्राणी जन्म होणे. जन्मानंतर जगणे अन मरणे अशी निरंतर चालणारी ही क्रिया उत्पादक व भक्षक रुपाने आपण सहज समजू शकतो. या निसर्ग चक्रातूनच नवजीवन अस्तित्वात येते. मात्र मानव वगळता इतर कोणत्याही सजीवात अंत्यविधी प्रथा अस्तित्वात नाही. मानव अधिक प्रगत होत गेला, विकसित होत गेला आणि निसर्गापासून दुरावला. पुढे संस्कृतीही विकसित होऊन परंपरा, रुढी, चालीरीती व विधी या संकल्पना अस्तित्वात आल्या. या सर्वांचे अनुकूल व प्रतिकूल परिणाम निसर्गावर होण्यास सुरवात झाली. या सर्वांची आजवरची गोळाबेरीज केल्यास ती निसर्गाला प्रचंड हानी पोहोचविणारी ठरली आहे.

प्राणवायू, पाणी आणि अन्न याशिवाय आपण जगूच शकत नाही. प्राणवायु शिवाय तीन मिनिटे, पाण्याशिवाय तीन दिवस तर अन्नाशिवाय तीस दिवस असा आजवरचा जनमानसाचा शास्त्रोक्त अनुभव आहे. यालाही वेगळी मानसिक व शारीरिक शक्ती लागतेच. खर म्हणजे पुस्तकी ज्ञानातील अन्न ही मुलभूत गरज वगळता वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या मुलभूत गरजाही येथे गौण ठरतात. माणसाला जगण्यासाठी प्राणवायूची, तो निर्माण करणाऱ्या झाडांचीच आवश्यकता आहे. मात्र याच माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल ९० लाख झाडांची दरवर्षी गरज भासतेय. भारतात दरवर्षी अंदाजे ८० लाख लोकांचा विविध कारणांनी मृत्यू होतो. त्यापैकी सुमारे ४५ लाख मृत मानवी जीवांना अग्नी दिली जाते. म्हणजे एकूण मृत्यूच्या ५६% मानवी मृत जीवांना अग्नी दिला जातो. यासाठी आपल्याला तब्बल ९० लाख झाडांचा बळी द्यावा लागतं असल्याचे दाहक वास्तव एका अभ्यासातून आपल्या समोर आले आहे. इतकंच काय तर या अंत्यसंस्कारामुळे भारतात दरवर्षी सुमारे ६५ चौरस किलोमीटरचे जंगलही कापल्या जाते.

झाड हे केवळ झाड नसत तर ते अनेक सजीवांना जीवन देणार नैसर्गिक यंत्र आहे. झाडाच्या वाढीसोबतच वातावरणातील कार्बन डायऑक्साईडमधील कार्बन शोषून घेण्याचा, वातावरणात ऑक्सिजन सोडण्याचा वेग वाढतो. एका झाडाची पूर्ण वाढ होण्यासाठी अंदाजे २० वर्षाचा कालावधी लागतो. यात तो माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजन देतो. तर मृत्यूसाठी कारणीभूत कार्बन शोषून घेतो. झाडांच्या जीवावर उठून आयुष्याचा अंत होतानाही आपल्याला याची तमा नसावी म्हणजे समजून न उमजण्यासारखे आहे. चिताग्नी देताना याची जाणीवही नसणे हे एक भयाण वास्तव आहे. एका माणसाला चिताग्नी देण्यासाठी किमान ३०० ते ४०० किलो लाकडांची गरज भासते. ही गरज प्रत्येकी २० वर्षे वयाच्या दोन झाडांमधून पूर्ण होते. झाडांची संख्या बरीच असेल तर ही समस्या येणार नाही. मात्र आता आपल्याला प्राणवायूची कमतरता जाणवत आहे. १४० वर्षापूर्वी वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण २१ टक्के होते. २०१२ मध्ये ते २०.६ टक्क्यांवर खाली आले आहे. झाडांची कत्तल नियमित होत गेल्यास हेच प्रमाण १९.५ टक्क्यांवर येईल. प्रसंगी प्राणवायूच्या अभावामुळे आपले गुदमरून मृत्यू होतील. एका माणसाला जगण्यासाठी किमान नऊ झाडांची आवश्यकता आहे. मात्र सध्या भारतात तीन माणसांमागे फक्त एकच झाड उपलब्ध आहे. विषय इतक्यावरच थांबत नाही तर झाडांच्या या कत्तली पशुपक्ष्यांच्याही मुळावर उठल्या आहेत. प्रत्येक झाडावर विविध पक्ष्यांच्या सरासरी दहा ते बारा घरटी असतात. एक झाड तोडल्यामुळे अंदाजे ४० ते ४५ पक्ष्यांचा अधिवास नष्ट होऊ शकतो. फुलपाखरांचीही यांचाही उपासमार होऊ शकते. झाडावर जगणारे कोळी, मुंग्या ई. सजीवावर यांचा वाईट परिणाम होतो.

अंत्यसंस्कारासाठी एलपीजी दाहिनीचा वापर हा उत्तम पर्याय आहे. नागपुरात याचा अवलंब झाल्यांमुळे गेल्या एका वर्षात तब्बल ७०० झाडांची कत्तल वाचली. अंबाझरी घाटावर या व्यतिरिक्त विदर्भातील पहिलीच एलपीजी दाहिनी आहे. एरवी लाकडांवर अंत्यसंस्कार करत असताना एका मृतदेहासाठी दोन झाडे कापावी लागतात. त्या तुलनेत एका मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी केवळ एक गॅस सिलिंडरच लागते. सन २०१४ मध्ये नागपुरात २०० मृतदेहांवरील अंत्यसंस्कार एलपीजी दाहिनीद्वारे करण्यात आले. म्हनुंनच इतरही शहरांमध्ये आता अंत्यसंस्कारांसाठी झाडांची कत्तल नको हा आवाज उठविण्याची वेळ आली आहे. गॅस दाहिनीला विरोध करणाऱ्या लोकांना सांगावेसे वाटते की, सध्याच्या घडीला प्रेत घरापासून स्मशानापर्यंत तिरडी खाद्यांवर उचलून नेले जात नाही. तर शववाहिनी घराजवळ येते त्यातून स्मशानात नेले जाते. ही सुधारणा अवलंबली जात असेल तर गॅस वाहिनीचा वापर करण्यास काय हरकत आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी वृक्षाला सोयरा म्हटले आहे. विज्ञानाचा विचार करता हवेच्या शुद्धीकरणात वृक्षांचे कार्य मोलाचे आहे. वृक्ष एकमेव घटकही आहे. वृक्ष तोडींमुळे आपण मानव स्वतच्या जिवांची हत्याच करीत आहोत. त्यामुळे जंगले नष्ट होत चालली आहेत. पशूपक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होत चालल्या आहेत. पावसाचे प्रमाण खूपच कमी होत आहे. त्यामुळे दुष्काळ पाचवीलाच पूजला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र आजही चालू आहे. वन्यपशूंना जंगलच अस्तित्वात नसल्याने ते मनुष्यवस्त्याकडे फिरू लागले आहेत. त्यामुळे सर्वांचेच आयुष्य धोक्यात येऊ लागले आहे.  स्मशानात उघड्यावर झाडांनी १५ वर्षात साठविलेला कार्बन डायऑक्साइड अंत्यसंस्कारामुळे हवेत मिसळल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. तयार होणारी रक्षा ही २५ किलोपेक्षा जास्त असते. प्रेत जळण्यासाठी १८ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. रक्षा नदीत विसर्जित केल्याने नद्यासुद्धा प्रदूषित होतात. हल्ली बरेच लोक हृदय व फुप्फुसाच्या रोगाने पीडित असल्याने त्यांनाही यापासून त्रास होतो. अंत्यसंस्कारासाठी गॅस दाहिनीचा उपयोग केल्यास अनेक फायदे होतात. लागणारा खर्च खूपच कमी होऊन वेळही वाचतो. प्रेत ज्वलन फक्त दोन तासातच होते. रक्षासुद्धा तीन किलोहून कमी होते. सबब नद्यांचे किंवा हवेचे प्रदूषण कमी होते. स्वच्छ वातावरणात अंत्यविधी केल्यामुळे आरोग्याचा धोका होणार नाही. सुशिक्षित व सुजाण समाजाने या बाबतीत प्रकर्षाने लक्ष घातले पाहिजे. हा धोका आपण वेळेवर ओळखला नाही. तर येणाऱ्या पिढीला आपल्या पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर व नाकाला मास्क लावून फिरण्याची वेळ लवकरच येईल. म्हणूनच पुढच्या पिढीला आपण चैनीच्या वस्तु, उच्च शिक्षण व आर्थिक सुसंपन्नता या सर्व गोष्टी देवू शकू परंतु शुद्ध हवा, शुद्ध पाणी, निरोगी शरीर देवू शकणार नाही. म्हणूणच प्रत्येकाने ‘अंत्यविधी हा गॅसदाहिनीमध्येच’ करावा असे स्वतःला वचन देण्याची वेळ आली आहे. आपल्या आप्त व नातेवाईकांपैकी जवळच्या लोकांना ही इच्छा वर्षातून एकदातरी व्यक्त करावी. जेणेकरून याचा प्रसार व प्रचार होईल. काळानुसार आपण अत्याधुनिक यंत्रे, मोबाईल व अप्लीकेशन वापरणं शिकलो. मात्र हा बदल आपल्या अस्तित्वासाठी स्वीकारणे काळाची गरज आहे. म्हणूनच आम्ही ‘जिंदगी के बाद भी…!’ हे अभियान हाती घेतोय. लँडमार्क या आंतररर्ष्ट्रीय फोरमच्या एस.ई.एल.पी.च्या संकल्पनेतुन अमरावती येथील डॉ. पंकज कावरे व यादव तरटे पाटील आणि दिशा फाउंडेशन, युथ फॉर नेचर, निमा व वेक्सच्या सहकार्यांने एक प्रकल्प राबविण्यास सुरवात झाली आहे. मृत्यू आपल्या हातात नाही, तो येईल तेंव्हा येईल पण शुद्ध हवा घेणे व ती जपणे आपल्या हातात आहे. म्हणून या सत्कार्यात अंत्यविधी हा गॅस दाहिनी मध्येच ही ‘अंतिम इच्छा’ जाहीर करून हातभार लावावा. आपल्या एका कृतीमुळे आपण यातून ‘जिंदगी के बाद भी ’ जीवन देण्याची ताकत ठेवाल हे मात्र नक्की…..!

@ यादव तरटे पाटील

वन्यजीव अभ्यासक, अमरावती

०९७३०९००५००

yadav.tarte@gmail.com

Yadav

Auther is a Member of Maharashtra State Board for Wildlife, wildlife conservationist, eminent nature activist, columnist & working for wildlife, environment & for tribal youth since 20 years. He is also working for anti-poaching, green administration & green journalism. He is also Founder of Disha foundation, Amravati based Organisation.

Recent Posts

तरुणांनो वन्यजीवांची हाक ऐका…..!

वन्यजीव संवर्धन ही सर्वच देशातील नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आहे. विशेष करून तरुणांची यात महत्वाची भूमिका…

4 years ago

मी चष्मेवाला

मी आहे चष्मेवाला..! पण मी चष्मा नाही लावत बर का..? आणि हो मी ‘मामा की…

4 years ago

वेडा नसलेला ‘वेडा राघू’

छोटा पाणपोपट हा पक्षी वेडा राघू नावानेच अधिक परिचित आहे. या पक्ष्याच आपण 'वेडा राघू'…

4 years ago

फ्रेंडशिप डे निसर्गाचा…!

एका गावात एका मुलीला उडणारे पक्षी खूप आवडायचे, पण एक दिवस राजा अचानक पक्षी मारायचं…

4 years ago

Beauty with Poison…!

Are butterflies poisonous? You will be perplexed if you ask this question. We know that…

4 years ago

सौंदर्यात दडलंय विष…!

फुलपाखरे विषारी असतात का.? हा प्रश्न विचारला तर तुम्ही नक्कीच बुचकळ्यात पडाल. साप, विंचू व…

4 years ago