वाघोबाचा लॉकडाऊन…..!

ज पायटी का नाई राजेहो, माया सपनात जंगलातला वाघोबा आला. म्हणे का रे बावा.., काय चालू हाय तुयावालं..? काय म्हणते तुये मानसं…? अन तुय शिमीटाचं जंगल…? म्या म्हन्ल तुमाले कायच सांगु राजेहो…! इथं त बेज्जाच वाट लागून हाय. लोक कसेच्या कसेच करून रायले. निरा भेदरले हायेत. त्यायले भल्लाच झ्याम्या बसला. या कोरोनान तं भल्लाच कहर करून टाकला हाय. कवा नसन झालं ते आता हून रायल. संचारबंदी का कोणती बंदी होय, देव जाणे ब्वा. कोणी कोणाच नाई आयकून रायल. जो थो आपलीच भादरून रायला. वाघोबा म्होरं सांगु लागला, खर सांगु का राज्या तुले, तसे बी आमचे लोकं लयच शेफारले होते. निरा नाम कवा बी काई बी करून रायले होते. वाटलं तवा झाड तोड, वाटलं तवा परदूषण कर, वाटलं तवा पलास्टीकचा कचरा कर, घंटा गाडी घरपोच येते तरीबी हे म्याट वानाचे सर्विस गल्लीत कचरा टाकते. पंतपरधान सायबानं सांगतलं नाई तरीबी हे फटाके काय फोडतत, भेटलं तवा हरण, मोर, ससा खाचा यायनं सपाटाच लावला होता. घोरपड अन तितर बटेर यैच्या जीभीचे चोचले पुरवाले यैले लागेच लागे.  यायनं लय मजा मारली अन बेज्जाच माजले बी होते. ते आयकाच्या तयारीत त न्होतेचं न्होते. हा कोरोना आला अन भल्ला देल्ला टोला त्यानं. आता बसले घरात मुंगा जिरून. मायं आयकून वाघोबा फिदीफिदी हासला, म्हणे राज्या काहीबी फेकू नको. माणूस होय ना तो. सुदरते थोडीच काई. हा कोरोना गेला की डब्बल जसच्या तसा नई झाला त माय नाव बदलून टाकजो.

मी चूप झालो बावा, काय बोलता इथं, आपून बोलाव अन त्याले राग यावं. कायले आपला कचरा करून घ्याच्या. असा माया डोस्क्यात इचार चालूच होता. तं मंदातच वाघोबा मले अजून सांगू लागला, म्हणे काहीबी असो मले त आता लयच गमून रायल. ते काय म्हणते रे, जीपस्या का फिपस्या होय तं. त्यायच्या चकरा बी बंदच झाल्या. हौसे गवसे बी बंद झाले. नईत हे मले, ना सुखान हागु देत होते, ना झोपू देत होते. सकाय झाली की माया उरावर तयारच रायत होते. काव आणला होता जीवाले राज्या यायनं. पण आता मले मस्त शिकारिले, खाले अन झोपाले काई तरासच नई रायला. आपून अन आपलं जंगल, मायी बम्म मजा सुरु हाय. हे सब्बन मी आपला कान देऊन मुकाट्यान आयकून रायलो. नई आयकत तं करता काय…! कुठी आपली ठेचून घ्याची. जंगलाच्या राज्या होय ना तो, तितं आपली काय ठाकूरकी. तो म्हणल तसं बावा…! नई का..?

दम नई घेत त तिकडून बिबट्या बी आला. त्याचा बी मुड लय खास वाटून रायला होता.  तो बी फुल्ल फुरसतीत होता. म्हणे एक्कट-डुक्कट माणसं सोळली तर त जंगलात कोनीबी येऊन रायल नई. फिराचं त सोळ मले पायाले बी कोणी येऊन राह्यल नई. नई तं जवा पायल तवा माया घरात येऊन यायनं खाना खराब करण लावला होता. जवा पायल तवा, अन त्यायले वाटलं तिथं, वाटलं ते बांधून रायले होते. इथं येऊन कायले भादरेपणा करते हेच इचीभीन मले समजून न्होत रायल. जवापासून हे टूरीजम-फुरीजम का काय होय म्हणते ना, तवापासून तुम्ही लेकहो माया जंगलात बम्म धिंगाणा सुरु केला ना….! आमचे सरे प्राणी कावल्यासारखे दिसून रायले होते. आत्ता आपलं कस हुईन याच्या कायजीन ते म्याट हून रायले होते. सुसाट जीप्स्या अन तैचा धुल्डा, आपून इकून गेलो का तीकून ते रस्त्यावर हजर, अन आपून दिसलो की निरा कावर कावर, इकून पाहू दे, तिकून पाहू दे, मोटमोठे पोंगे काढून ते त्यातून काय पायतत देव जाणे, फक्त खट खट खट आवाज येते कायचा होय त..! बर बेशरम इतके हाय की आपून जाये परेंत थे जात बी नाई. मी तं म्हणतो बर झालं हा कोरोना आला, जसा माणसाले जगाचा अधिकार हाय ना..!  तसा आमालेबी होताच ना रे बाबू. एक दोघं जन ठीक हाय, पण तुम्ही लेकहो लयच धिंगाणा सुरु केलता ना. उठले सुटले, अन जवा पायला तवा कुठ..? त चल्ले माया जंगलात. बर मले हेच समजत नई की, तुम्ही मले पावून करता काय बे…? मले पाहाले तुम्ही माया जंगलात येता, त मी काई बोलतो तरी का..? नाई ना…! बर मले येक सांगा, तुम्ही आमाले पायता, त पुढी त्याच करता काय…? पण मंग मी तुम्हाले पाहाले तुमच्या गावात आलो तर काहून कल्ला करता बे मंग..? तुमची त फाट्टे मंग, मंग इचारपूस न करताच मले नरभक्षक अन काय काय म्हणता लेकहो. लाज कशी नई वाटत बे तुम्हाले..! मी बिबट्याचं मुकाट्याने आयकून रायलो. तसबी मंदात बोलून कुठ आपली शेकून घेता. शेकून घ्याले थोडी पुरते. काऊन का तो बरोबरच बोलून रायला होता.
तुम्ही लेकहो आमाले आज ठावकोर लयच परेशान केलं ना..! काजून काय हाय तं, पण आम्ही कवाबी जंगलापशी, नई त गावापशी सहज फिरतानी बी दिसलो, त तुम्ही लेकहो मले लगेच पिंजऱ्याचा रस्ता दाखोता. बह्याळ तोंडेहो, तुमाले हे काउनच समजून नई रायल…? की तुमीच तं आमच्या जंगलात अतिक्रमण करून रायले. तुमाले लाकूड पायजे त, घुस जंगलात. जायाले काड्या पायजे त, घुस जंगलात. गाया म्हशी चाराच्या हाय त, घुस जंगलात, बोर चारोया टेम्भ्र खाचे असल त, घुस जंगलात. तवाच तुमाले जंगल दिसते. हेत काईच नाई राज्या हरण, मोर खासाठी बी हे मातीखाये जंगलात येत रायते. झाड लावाच यायच्या भोकावर येते. पहाड खोदाचा तं यैन सपाटाच लावला. जंगल, पहाड टिकन तं पाणी भेटन तुमाले प्याले. बाबू जंगल हाय म्हणून तलाव, नद्या अन नाल्याले पाणी येते. तुमाले आमच्यामूळ पियाले पाणी भेट्टे, मंग हेच पाणी तुम्ही तुमच्या वावराले हे देता. तुम्ही इतके हेंबाड थूथ्रे हाय की, हे समजून बी तुम्ही न समजल्या सारख करता बे लेकहो. तुमाले झाली हाय फुकटचा माल खाची सवय, जवा पायल तवा तुमाले माया जंगलातला फुकटाचा माल पायजे. जस तुमच्या बाजीचाच मठ हाय. धन्य हाय राज्या तुम्ही अन तुमची माणूस परजाती.


तुम्ही इथीसा गिट्टीच्या खदाणी आनल्या, परकल्प आणले, झाड तोडून अन बगारे पोखरून रस्ते बी केले, आमच्या जंगलावर अतिक्रमण करून वावरं करता, माती, रेटी, गिट्टी पायजे तवा माया जंगलातूनच त नेता. इतके हावरट काउन अन कसेच झाले राज्या तुम्ही लोकं…! बर माय काय म्हणनं हाय..! आमाले तुम्ही काहून परेशान करता राज्या..? आम्ही आजठावकोर तुमच कवाबी काईबी वाकड केल नाई. तरीबी आमच्या जंगलात येऊन काड्या करत रायता. तुमचे ढोर खाल्ले अन कवाकवा तुमच्या अंगावर गुरगुर केली तं आमालेच नरभक्षक म्हणून हिनोता. बर मले येक सांगा की, आम्ही तुमच्या घरात आलो तं आमच स्वागत करता का…! नाई ना..! मंग आमच्या घरात तुम्ही काहून अतिकरमन करता? आमच जंगल तुमच्या सारख ईस्मार्ट नाही पन पवित्र नक्कीच हाय. इत्चा येकही प्राणी इच्चे कायदे कानून मोडत नाही. आम्ही एकमेकाच्या ढुंगणात काड्या बी करत नाही. नीलगाय हागते ना बाबू, तवा तिची हागु बी हत्ती किड्याले जीवन देते. पक्षी, फुलपाखरे, मधमाश्या हाय म्हणून झाडाले फय लागते. वाघापासून ते वायवी परेंत आमची अन्नसाखयी बेज्जा पक्की हाय. आमच्यात लय घट्ट नात हाय. आम्ही एकमेकाले घेऊन संगमंग चालतो. आम्ही जंगलाचा नासोडा नाई हू देल्ला कवा. तुम्ही अन तुमचा ईकास आला अन सारा धिंगाणा लावला बे लेकहो…! सऱ्यात बस्तर परजाती हाय तुमची..!
आमचा ईरोध कायलेच नाई. आमाले तुमच्यासंग काई घेणदेण नाई. तुमच्यासंग आमच काई अडत बी नई. अन तुमच्यावाल आमी काई वाकडबी  करू शकत नाई. तुमाले वाट्टे ना..! घ्या मंग उरावर तो तुमचा ईकास होय का होय त….! तुमचा ईकास तुम्हालेच मुबारक हो बावा, मुबारक हो शिमिटाच जंगल. तिथीसा अशुद्ध हवा, कयक्लं पाणी, निरा लोकायचा बजार अन कल्लाच्या कल्ला…! आमच्या जंगलात मायासकट हरन, आसोल अशे बक्कम प्राणी, पक्षी, साप, फकड्या, सड्डूके, बेंडक्या, मासोया अन कातण्या रायतात. या साऱ्यायले या जंगलान आपल्या पोटात घेऊन यायले आसरा देल्ला हाय. या जंगलाचे उपकार मायाच्यानं तं जिंदगीभर बी फिटू शकत नई. तुमाले आता निसर्गान येक सुधराची शेवटची संधी देल्ली हाय, अजुनबी टाइम गेला नई बाबू, पाहा काय करता त…? झाड लावा, परदूषण कमी करा, माया जंगलाशी दोस्ती करा, परेटनाचा धांगडधिंगा कमी करा, पिलॅस्टीक कचरा कमी करा, सगळ अपोपाप बरोबर करते तो निसर्ग….! हे आखरी मोका हाय भाऊ सुधराच अशीन त सुधारून जा..! इतकंचं बोलला वाघोबा, डोये पाणावले त्याचे अन माये बी. भविष्यात कस हुईन या चिंतेन आम्ही दोघानबी आपआपला रस्ता नापला.

@ यादव तरटे पाटील
वन्यजीव अभ्यासक,
दिशा फाउंडेशन, अमरावती
www.yadavtartepatil.com
disha.wildlife@gmail.com

(तळटीप- सदर लेख वऱ्हाडी भाषेत असून यातील उल्लेख केलेल्या शिव्यांचा संबंध कुणाशीही लावू नये. असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. वऱ्हाडी भाषेचा बाज आणि गोडवा यावा यासाठीच म्हणून तो उल्लेख सदर लेखात केलेला आहे.)

(शब्दार्थ- बगारा = टेकडी, वायवी = वाळवी,  इकास = विकास, शिमिट = सिमेंट, कयक्ल = घाण, आसोल = अस्वल, बक्कम = पुष्कळ, सड्डूके = सरडे, फकड्या = फुलपाखरू, बेंडक्या = बेडूक, मासोया = मासे, कातण्या = कोळी,  परेटन= पर्यटन, कावल्यासारखे= कंटाळा आल्यासारखे)

Yadav

Auther is a Member of Maharashtra State Board for Wildlife, wildlife conservationist, eminent nature activist, columnist & working for wildlife, environment & for tribal youth since 20 years. He is also working for anti-poaching, green administration & green journalism. He is also Founder of Disha foundation, Amravati based Organisation.

View Comments

  • आहा .... वर्हाडी ठेका ....... मस्तच आर्टिकल.... सुंदर

      • खूप सुंदर लेख,
        सत्यपरिस्थिती आहे ही सध्या आपले जंगले व त्यातील वन्यजीव सुरक्षित व मोकळा स्वास घेत आहेत.
        तरी माणूस हा प्राणी पुन्हा आपले प्रदूषण चालू करत आहे कालच लाऊड स्पीकर चे आवाज चालू झालेत?

        • अगदी बरोबर
          सुधारणार नाही माणस
          धन्यवाद

    • गावरान ठसक्यात सुंदर संदेश दिला हावरट मानवाला...खरंय वाघोबाच नाही सुधारणार आपण... लॉक डाऊन हतू द्या मग पहा जंगलांची हालत....सुधारा रे अजूनही वेळ गेलेली नाहीये....मस्त...धन्यवाद....?

        • यादवराव, लयं भारी लिवलय तुम्ही..माणसाच्या थुत्थरात बस अशी बाजू लिवली.
          वाचून भल्ला हासलो मी.

          • धन्यवाद डॉ.नानासाहेब
            गरज होतीच, आभारी आहे.

  • बाप्पा यादव सर तुम्ही न तर लईच भारी लेख लिव्हला .... लोक काऊन भयाड वानी असं करून राहिले काय माहिती..... ...

    • हाव लिहाव म्हणल जरासक, जमला भूत्ता
      धन्यवाद

      • खुप चांगलं लिहल भाऊ मज्जा आली तुमचं जंगलावरच प्रेम बघून खुप अभिमान वाटत.
        मस्त

      • धन्यवाद वकील साहेब
        आपल्या हाती जबाबदारी आहे.

  • जे प्राण्यांना समजते ते यांना कधी समजन..

    .आता तरी लोकांच्या दिमाखात गोष्टी घुसल्या पाहिजे काहीतरी...... नाहीतर निरा भयाडा वाणी वागतात लोक....

    • हवं ना सुधरत नई
      आपून आशा करू की सुधरण म्हणून
      धन्यवाद Madam

    • लयच खास लीवता राव..! पाखरं, जनावर, निसर्ग, यांच्या इचार पदतशिर मांडून मन कालून टाकल.

  • अगदी खरंय हय तर टे गुरुजी ही माणसाची जात च एक फार मोठा virus आहे हे कधीच सुदरणार नाहीत हे स्वताले संपवून घेतील एके दिवशी, पण तुम्ही तुमचे कार्य चालू ठेवा खूप चांगले काम करत आहात तुम्ही wildlife conservation व त्याचे महत्व सांगून व त्याची काळजी घेऊन, बघू वाघोबा च्या ह्या सांग ल्याने काही फरक पडतो का

    धन्यवाद

    • हो ना राजेहो वानखडे सर
      पाहू आता काय होते त..
      बाकी धन्यवाद

  • सर ....
    लयच खास हो.. वाघोबा भल्ले मनापासून बोलले.

    • हवं ना राज्या पंकज भाऊ
      वाघ बोलले देव बोलले
      बाकी धन्यवाद

  • वाघाचे मनोगत तेही वऱ्हाडी भाषेत....! लय भारी...!

  • अतिशय उत्तम रित्या व्हराडी भाषेतील लेख, वाचतांना खूप मज्जा वाटली, पण मनाला भिडणारे प्रत्येक निसर्गप्रेमींचे हेच मनोगत आहे!!!!
    धन्यवाद !!!असेच लिहीत राहा!!!!???

    • नक्कीच सर
      खूप खूप आभारी आहे आपला, धन्यवाद

  • लयच खास. मज्जा आली वाचून जंगलाचा जांगडगुत्ता.

Recent Posts

तरुणांनो वन्यजीवांची हाक ऐका…..!

वन्यजीव संवर्धन ही सर्वच देशातील नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आहे. विशेष करून तरुणांची यात महत्वाची भूमिका…

4 years ago

मी चष्मेवाला

मी आहे चष्मेवाला..! पण मी चष्मा नाही लावत बर का..? आणि हो मी ‘मामा की…

4 years ago

वेडा नसलेला ‘वेडा राघू’

छोटा पाणपोपट हा पक्षी वेडा राघू नावानेच अधिक परिचित आहे. या पक्ष्याच आपण 'वेडा राघू'…

4 years ago

फ्रेंडशिप डे निसर्गाचा…!

एका गावात एका मुलीला उडणारे पक्षी खूप आवडायचे, पण एक दिवस राजा अचानक पक्षी मारायचं…

4 years ago

Beauty with Poison…!

Are butterflies poisonous? You will be perplexed if you ask this question. We know that…

4 years ago

सौंदर्यात दडलंय विष…!

फुलपाखरे विषारी असतात का.? हा प्रश्न विचारला तर तुम्ही नक्कीच बुचकळ्यात पडाल. साप, विंचू व…

4 years ago