‘सह्यान्द्रीच्या मातीत नवीन पालींच्या प्रजातींचा शोध लागला, आणि एका प्रजातीला ‘लिमयेज गेको’ अस नाव देण्यात आलं. इतकंच काय तर चक्क एका नवीन आढळलेल्या कोळ्याचही ‘जरझेगो सुनीललिमये’ या नावाने बारस झालं. ही बाब वनविभागाच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच घडली. सन १९८८ च्या भारतीय वनसेवेच्या तुकडीतील वनाअधिकाऱ्याचा असाही गौरव वन्यजीव संधोधकाकडून व्हावा. हेही एक नवलच…! खर तर एक कर्तव्यदक्ष वनाधिकारी, वनाधिकाऱ्यातला वन्यजीवप्रेमी, वन्यजीवप्रेमींचा लाडका अधिकारी, उत्कृष्ठ प्रशासक आणि मनमिळाऊ व्यक्ती म्हणून सुनील लिमये सर्वपरिचित आहेत. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) अश्या उच्चपदी कार्यरत असतांना देखील ते मनमिळाऊ अधिकारी म्हणून लोकप्रिय आहेत. हे इतकं सहजासहजी त्यांना मिळाल अस अजिबात नाही. सुनील लिमये यांच्या या यशाच्या संघर्षही तितकाच कसदार आहे.
सुनील लिमये हे मूळ कोल्हापूरचे, आता कोल्हापूरचे म्हटल्यावर लहानपणापासूनच त्यांना व्यायामाची आवड लागली. मल्लनगरीच्या भीभीषण पाटलांच्या तालमीत बनलेलं त्यांच पिळदार शरीर, विजिगिषु मुद्रा, धिप्पाड बांधा आणि कायम उत्साही असणारे बाज घेऊन सुनील लिमये जेंव्हा भेटतात तेंव्हा असे भासते जणु साक्षात सूर्यमुद्राच….! गोरापान चेहरा, पिळदार दंड, तब्बल ६.२ फूट उंची आणि अस्सल चोवीस कॅरेट कोल्हापुरी बाज त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हा एक वेगळा पैलू आहे. बालपण खेळ, मस्ती, कुस्ती आणि चित्रपटात रमलेल असतांनाही शिक्षणातही ते कधीच मागे पडले नाही. वडील कडक व तापट स्वभावाचे होते. वडिलांना सुनील यांच अस अल्लड वागणे आवडत नसे. गम्मत म्हणजे त्या काळात धर्मेद्रचे चित्रपट पाहून त्यांना अनेकदा रात्र ही घराबाहेर काढावी लागायची. १२ वि म्हणजे आयुष्याला वळण देणारी वाट, आणि याच वाटेवर आपली वाट लागली तर मग काय ना, बरच बर…! नेमक घडलही तसच, सुनील लिमये यांना १२ वीत कमी गुण मिळाले. घरात बाबा रागावले. मग काय वडिलांच्या पाया पडून त्यांनी घराला रामराम ठोकला आणि थेट पुणे घाठलं. त्यांनी एस.पी कॉलेजला बी.एस.सी.ला प्रवेश घेतला खरा पण आता राहायचा कुठे? हा प्रश्न त्यांना सतावू लागला. अनोळखी शहर, अनोळखी माणसे अश्या परिस्थितीत काय होणार…? मात्र मातीतल्या माणसाची आणि सच्च्या सेवकाची निसर्ग बरोबर व्यवस्था करतो. मेहनत आणि इच्छाशक्ती असणाऱ्याला आयुष्यात कधीच काहीच कमी पडत नाही हा एक निसर्ग नियमच आहे. सुनील लिमये यांच्या मावशीचे पुण्यात प्रभात रस्त्यावर एक हॉटेल आहे. रविराज नावाचे हे हॉटेल आजही चालू आहे. महिन्याला ४० रुपये पगाराने त्यांनी काम चालू केलं. दिवसभर काम अन रात्री त्याच हॉटेलच्या टेबलवर रात्र काढायची. अश्या परिस्थितीला तोंड देत त्यांनी पदवी संपादन केली. पुढे स्पर्धा परीक्षेची वाट धरली. आज त्याच हॉटेल मध्ये जेव्हा ते पिवळ्या दिव्याच्या गाडीतून उतरतात तेव्हा वाटतं कि, यालाच आपल्या मामाच यश म्हणायचं, अशी भावना आज त्यांचा भाचा मयुरेश कुलकर्णी व्यक्त करतो.
सुनील लिमये यांच्या जन्म १४ सप्टेंबर १९६२ साली कोल्हापूरमध्ये झाला. वडील कृषी विभागात कामाला असल्याने कुटंबाचे एका ठिकाणी बस्तान नव्हते. त्यामुळे लिमयेंचे शालेय शिक्षण जळगाव, नाशिक व कोल्हापूर येथे झाले. शालेय जीवनापासूनच त्यांना जंगलाची ओढ होती. पुढे महाविद्यालयीन वयात ‘ट्रेकिंग, हायकिंग सारखे छंद जोपासल्यामुळे निसर्गाप्रतीची त्यांची ओढ अधिक पक्की झाली. त्यावेळी लिमये यांची सैन्यामध्ये भरती होण्याची इच्छा होती. विज्ञान शाखेतून ‘जियोलॉजी’ या विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘फॉरेस्ट्री’ या विषयातून पदव्युत्तर शिक्षण आणि १९९१ साली डेहराडूनच्या ‘भारतीय वन्यजीव संस्थान’ मधून ‘वाईल्डलाईफ’ या विषयामधून ‘एमएससी’ पूर्ण केले. स्पर्धा परीक्षेच्या तयारीतून एम.पी.एस.ची. परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) पदी निवड झाली. त्याचे प्रशिक्षण सुरु असतानाच त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना नेमक ओळखले. आणि त्यांची आवड, मेहनत आणि चिकाटी बघून त्यांनी यु.पी.एस.ची. ची परीक्षा द्यावी असे त्यांना सुचविले. यु.पी.एस.सी. परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात त्यांची भारतीय वनसेवेत निवड झाली. हॉटेल मध्ये काम करणारा तरुण ते थेट भा.व.से. (IFS) अधिकारी असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास आजच्या तरुणांना सूर्याची उर्जा देणारा आहे. निवड झाल्यावर पहिली पोस्टिंग मेळघाटातील चिखलदरा येथे झाली. ज्याच्यात दम आहे त्यालाच निसर्ग संघर्ष करायला भाग पाडतो. प्रत्येक वेळी त्याच्या समोर एक एक नवीन आवाहन तयार असतेच. अनेक आवाहनांना उत्तर देत हा रांगडा वनाधिकारी आयुष्य केवळ जगतच नाही तर अनेकांना त्यांचा जीवनपट जगण्याची उमेद देणारा आहे. सन १९९३ साली लिमये सर मंत्रालयात ‘स्पेशल ड्युटी ऑफिसर’ म्हणून कार्यरत होते. तदनंतर ते कोल्हापूर वनपरिक्षेत्राच्या उपवनसंरक्षक (वन्यजीव) या पदावर रुजू झाले. कोल्हापूरमध्ये कार्यरत असताना त्यांनी राधानगरी, सागरेश्वर, कोयना अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या वन्यजीव व्यवस्थापनाला शास्त्रीय कामांची जोड दिली. त्यांनी राधानगरी वन्यजीव अभयारण्यात सुरू असणाऱ्या अवैध खाणकामावर बंदी आणली. १९९७ ते २००३ या कालावधीत कोल्हापूर, अलिबाग आणि सातारा वनक्षेत्रात उपवनसंरक्षक पदावर कार्यरत असताना त्यांनी येथील अतिक्रमणावर सुद्धा धडक कारवाई केली.
साहसी खेळ आणि निसर्ग पर्यटनातून स्थानिकांना रोजगारनिर्मिती साठी त्यांनी याच ठिकाणी मार्ग खुला करून दिला. पुढे अमरावती येथील ‘आदिवासी अप्पर आयुक्त’ म्हणून त्यांची कारकीर्द आजही माझ्या आठवणीत आहे. त्यांची आणि माझी पहिली भेट इथेच झाली. या दरम्यान त्यांनी आदिवासी मुले आणि स्त्रियांचे आरोग्य व शिक्षणासंबंधीच्या प्रश्नांवर मूलभूत काम केले. आदिवासी आणि पारधी समाजातील लोकांकरिता रोजगार निर्मितीचे अनेक उपक्रम सुरू राबविले. पुढे मुंबईतील ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’च्या संचालकपदी असलेला त्यांचा कार्यकाळ विशेष करून गाजला. त्यांनी राष्ट्रीय उद्यानाला पोखरणारे मालाड, कांदिवली आणि गोरेगाव येथील अतिक्रमण जमीनदोस्त केले. मानव-बिबट्या संघर्षाचा प्रश्न थोपविण्यासाठी त्यांच्या सुपीक डोक्यातून आलेली ‘मु्ंबईकर फॉर एसजीएनपी’ ही मोहीम महत्वपूर्ण ठरली. यात वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे कार्यकर्ते, स्थानिक लोक आणि माध्यमातील प्रतिनिधींना समाविष्ट करून घेण्यात आले. या मोहिमेने मानव-बिबट्या संघर्षाच्या जनजागृतीला नवी दिशा दिली. सुनील लिमये यांच्या पुढाकाराने सुरू झालेली ही मोहीम आजही कार्यरत आहे. या मोहिमेचा आदर्श घेत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल आणि राजस्थान वनविभागाने अशा प्रकारच्या लोकचळवळींना सुरुवात केली आहे.
बोरिवलीच्या ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’च्या संचालक पदावर असतांना सुनील लिमये यांनी लोकचळवळी सुरू करण्याच्या मानस ठेऊन त्याविषयी माध्यमातील प्रतिनिधींचे प्रबोधन करण्यासाठी एक पत्रकार परिषद बोलावली. त्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने ‘आम्हाला सांगण्याऐवजी तुम्ही तुमच्या हल्लेखोर बिबट्यांवर नियंत्रण मिळवा,’ असा खोचक प्रश्न विचारला. त्यावर लिमये यांनी सुंदर उत्तर दिले, ते असे की, “लेका, मी बिबट्यांना या पत्रकार परिषदेचे आमंत्रण देऊ शकत नसल्यामुळे तुम्हाला माझी बाजू समजावून सांगतोय,” यावरुन त्या परिषदेत एकच हशा पिकला. लिमये यांचे हे उत्तर मानव-बिबट्या संघर्षाच्या उपययोजनांच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटते. बिबट्या हा प्राणी ‘समस्या’ नसून आपणच त्याच्या क्षेत्रात वावरताना योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे, ते या उत्तरातून सांगू पाहण्याची त्यांची दूरदृष्टी भविष्याचा वेध घेणारी आहे. नागपूर येथील ‘अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, पूर्व’ (वन्यजीव) या पदावर त्यांच्याकडे विदर्भ आणि त्यामधील ताडोबा, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा व बोर या पाच व्याघ्र प्रकल्पांच्या वन्यजीव व्यवस्थापनाची जबाबदारी होती. नुकतीच त्यांची मुंबईतील ‘अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, पश्चिम’ (वन्यजीव) या पदावरून बढती झाली आहे. सध्या ते राज्याचे मुख्य वन्यजीव रक्षक तथा राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील वन्यजीव संरक्षण, संवर्धन तथा व्यवस्थापनासाठी नक्कीच ते आपल्या कामाच्या ठसा उमटवतील. भारतीय वनसेवेतील सनदी अधिकारी असलेल्या या ‘जाणत्या वनराजा’ ची कारकीर्द असीच फुलत राहो, एक कर्तव्यदक्ष अधिकारीच नव्हे तर एक व्यक्ती म्हणूनही त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा…..!
© यादव तरटे पाटील
दिशा फाउंडेशन, अमरावती
संपर्क- ९७३०९००५००
Email – disha.wildlife@gmail.com
Website – www.yadavtartepatil.com
दूध का सार मलाई मे,
और जिंदगी का सार भलाई मे…
या वाक्याची प्रचिती खरं तर लिमये साहेबांच्या जीवनातून निरंतर येते,
माझे जीवनातील आदर्श व्यक्तित्वामध्ये लिमये साहेबांचं नाव आवर्जून येतं,,फारच अप्रतिम लेख लिहला??त्यांचं व्यक्तिमत्व सर्वांना आदरणीय व आपलंसं वाटतं,,अमरावती येथे अप्पर आयुक्त पदावर असतांना त्यांनी फार उपयुक्त व विकासात्मक कार्य करून आदिवासी विभागात आमूलाग्र बदल घडवून आणले, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व उच्च अधिकारी यांना समान वागणूक देऊन , माणुसकी जपणारा एक सच्चा अधिकारी, महिलांना आदरपूर्वक वागणूक देऊन जिव्हाळ्याच्या भावाप्रमाणे वागणूक देणारे आदरणीय अधिकारी पुन्हा कधीच लाभणार नाही,, साहेब तुमचे कार्य नेहमी स्मरणात राहील असे पूजनीय व्यक्तिमत्व आहात तुम्ही, आमच्या dept ला पुन्हा तुम्ही येऊन विकास घडवून आणावा ही विनंती,, ??????
त्यांच्या कार्याला व tarte patil तुमच्या शब्दमांडणीला सलाम?
फार अप्रतिम लेख लिहून थोर व्यक्तिमत्वाच्या कार्याला उजाळा दिलात धन्यवाद???
धन्यवाद इंगोले मॅडम
पुढेही वाचत रहा.आपण प्रतिक्रिया दिली खूप खूप आभारी आहे.
येवढा दिलखुलास अन् कर्तव्याशी प्रामाणिक अन् रुबाबदार नट शोभावा असा उच्चअधिकारी माझ्या पहाण्यात तरी आला अद्याप तारी आला नाही.
प्रिय नितीन सर
आपलं म्हणन अगदी बरोबर आहे.
लेख वाचून आपला अमूल्य वेळ देऊन प्रतिक्रिया दिली त्यासाठी अनंत आभार.
धन्यवाद