हिरव्या संघर्षाचे धनी : किशोर रिठे
२१ मार्च हा जागतिक वन दिन म्हणून साजरा होतो. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात याच दिवशी हिरव्या संघर्षाचे बीजारोपण देखील व्हावे. हा केवळ योगायोग म्हणता येणार नाही. हा नियती आणि निसर्गाचाच खेळ म्हणावा लागेल. जणु निसर्गालाही संवर्धनासाठी पेटणारे ‘संघर्षाचे धनी’ हवे आहेत की काय असे वाटू लागते. निसर्ग संवर्धनाच्या ध्यास घेऊन काही व्यक्ती मोलाचे कार्य करतात. कारण त्यांच्या रक्तात भिनलेली निसर्गसेवा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. भान ठेवून योजना आखने व बेभान होऊन अंमलबजावणी करायला भाग पाडणे, या प्रकारात मोडणारे अवलियाच मग खरी किमया घडवून आणतात. हे निसर्गाचे किमयागार इतक्यावरच थांबत नाहीत तर त्यांचा जीवनपटही अनेकांना संघर्ष करायला भाग पाडतो. अनेकांना प्रेरणा देणाऱ्या हा संघर्षाचा प्रवास पुढे अनेक वाटसरुंचा आवडीचा मार्ग ठरतो. हे वनप्रवासी मग बिनदिक्कतपणे आपआपल्या ध्येयाने मार्गस्थ होतात. यातून केवळ पुढची पिढीच घडत नाही तर त्याही पुढच्या पिढीचे बीजारोपण ही होते. म्हणून असे वन संवर्धक आपल्याला हवेहवेसे वाटतात. भविष्यात जंगल आणि वन्यजीव सुरक्षित राहावे म्हणून झटणाऱ्या अश्या माणसापुढे आपण नतमस्तक होतो.
महाविद्यालयीन शिक्षणानंतर एक तरुण संगणक अभियंता होतो. नामांकीत महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू होतो. पण तिकडे काही त्याच मन रमत नाही. तो कसलाही विचार न करता बक्कळ पगाराच्या नोकरीला चक्क रामराम ठोकून हिरवी वाट निवडतो. चमत्कारिक असलेला हा प्रवास आजच्या आणि पुढच्या पिढीलाही प्रेरणादायी ठरतो. मध्य भारतातील वने, वन्यजीव व पर्यावरण क्षेत्रात सतत तीन दशकापासून सातत्याने धडपडणारे किशोर रिठे हे यातलच एक व्यक्तिमत्व होय. इंग्लंड मधील ऑक्सफोर्ड विद्यापीठातून वन्यजीव संवर्धन या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करून पुढे आस्ट्रेलिया, युगांडा व थायलंड देशातूनही विविध अभ्यासक्रम आजवर त्यांनी पूर्ण केले आहेत. किशोर रिठे यांनी आजवर ३० हून अधिक शासकीय समित्यावर काम करतांना राज्य व केंद्र शासनास एकूण १७ अहवालातून महत्वपूर्ण सूचना, सुधारणा व प्रभावी प्रश्नांची हिमतीने मांडणी केली आहे. या सर्वांचा पाठपुरावा करतांना आलेल्या प्रत्येक अडचणींचा त्यांनी सामना करत मुक्या जीवांना न्याय देण्यासाठी आपली ताकत पणाला लावली. मध्य भारतात वाघ, गडचिरोली परिसरातील कोलामार्का भागात रानम्हैस, मेळघाटात अनुक्रमे रानपिंगळा व महासीर मासा यासारख्या नष्टप्राय होत असलेल्या जीवांसाठी आशादायी चित्र निर्माण केलं. वाघाला मुक्त अधिवास मिळावा म्हणून तयार करण्यात आलेल्या व्याघ्र प्रकल्पातील पुनवर्सन प्रक्रियेत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अमरावती येथे निसर्ग संरक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा श्रीगणेशा केला. या कामाची सुरवात होताच पुढे नागपुरे येथे सातपुडा फाउंडेशनची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली. गेल्या १७ वर्षापासून मध्य भारतातील महत्वाच्या ७ व्याघ्र प्रकल्पामधील तब्बल शंभरहून अधिक गावांमध्ये त्यांनी कामाची उभारणी केली आहे. आपल्या ३० विद्याविभूषित सहकाऱ्यांच्या चमुद्वारे सर्व गावामध्ये आरोग्य, निसर्ग शिक्षण, रोजगार, कृषी व वानिकी आधारीत ग्रामविकासाची ते कामे करीत आहेत. आजवर सुमारे दोन लाख आदिवासी रुग्णांना मोफत आरोग्य सेवा तसेच तब्बल ५००० आदिवासी तरुणांना कायमस्वरूपी रोजगारांची दारे त्यांनी उघडी करून दिली आहे.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट सारख्या दुर्गम भागात काम कारणारे दुर्मिळच..! हेही आवाहन स्वीकारत त्यांनी सन २००६ मध्ये हरिसालजवळ ‘मुठवा’ तर नागपूर जिल्ह्यतील पेंच व मध्यप्रदेशातील मंडला जिल्ह्यात ‘संशोधन व समुदाय केंद्र’ ची स्थापना केली. वन आणि वन्यजीव संवर्धन या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलं असून अनेक वृत्तपत्रात त्यांनी स्तंभही लिहिलेले आहेत. ‘रानावनातील मूड्स’, ‘हिरवा संघर्ष’ आणि ‘मार्गदर्शक-महाराष्ट्र वनविभाग’ ही मराठीतील तर ‘मिशन सातपुडा:सँच्युरी एशिया’ या इंग्रजी पुस्तकाचे ते लेखक आहेत. इंग्लंडच्या महाराणीद्वारे लंडन येथील बकिंगहम पॅलेस येथील खास निमंत्रणावर त्यांचा सत्कार करण्यात आला. अमेरीकेतील प्रसिद्ध पर्यावरण पुरस्कार, टायगर लिंक, अशोका फेलोशिप, इंग्लंड येथील बॉर्न फ्री फेलोशिपसह लाईफ फोर्स चॅरीटेबल ट्रस्ट फेलोशिप आदि मार्फत त्यांच्या कार्याचा आजवर गौरव झालेला आहे. नुकताच त्यांना महाराष्ट्राची गिरीशिखरे पुरस्कार जाहीर झालाय. हिरव्या संघर्षाच्या या रोपट्याच रुपांतर आता वटवृक्षात झालय. या डेरेदार वटवृक्षाच्या सावलीत आज अनेक निसर्गसेवक घडत आहेत. इतकंच काय तर किशोर रिठे यांच्या परीसस्पर्शाने सातपुडा पर्वतातील वाघांनाही आता मोकळा श्वास घेता येतोय.
© यादव तरटे पाटील
सदस्य – राज्य वन्यजीव मंडळ, महाराष्ट्र राज्य
संपर्क- ९७३०९००५००
www.yadavtartepatil.com
सुंदर लिखाण
किशोरजी रिठे ह्यांना भेटल्यावर “अवलियाच मग खरी किमया घडवून आणतात.” ह्याची प्रचिती येते.