कोल्हापुरचा ‘वन’मल्ल : सुहास वायंगणकर

कोल्हापुरचा ‘वन’मल्ल : सुहास वायंगणकर

माणसासाठी धावणारे इथे हजारो आहेत. पण मुक्या प्राण्यांसाठी धडपडणारे आजही बोटावर मोजण्या इतकेच…! “वनस्पती, वन्यप्राणी, पक्षी, फुलपाखरे व कीटकांचे संवर्धन झाले तरच मानवाचे संवर्धन शक्य आहे.” हे मानवाच्या अस्तित्वाच अन आयुष्याच गमक या रानवेड्यांना कळत तरी कस..! ते कळलंय म्हणूनच तर ते बेभान होऊन या निसर्ग सेवेत तल्लीन होऊन काम करतांना दिसतात. म्हणजेच जंगलातल्या या न तुडववेल्या वाटेवरचे हे प्रवासी आपली तहान भूक विसरून या निस्वार्थ सेवेत मग्न होतात. अश्या न तुडवलेल्या वाटांना ना किलोमीटरचे दगड असतात ना त्या वाटेवर गाव लागते. ना अलिशान मुक्कामाची सोय ना पंचपक्वानाचा बेत मिळतो. मात्र हे रानवेडे अवलिया निमुटपणे आपली निसर्गसेवा करण्यात मग्न असतात. पक्ष्यांच्या मंजुळ आवाजात आपला सूर मिसळवत तर कधी फुलपाखराप्रमाणे जंगलाभोवती रुंजी घालत तल्लीन होऊन निसर्गाची सेवा करतात. प्रसिद्धीच्या दूर राहून ते आपल्या कामाचे प्रदर्शन करीत नाहीत. सुहास या व्यवस्थेतला सच्चा वनमित्र आहे. गोठलेली नदी जशी बर्फाखालुन वाहते तसा सुहास वाहतो. विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक आणि सामान्य माणूस यांच्या मनात घर करून निसर्ग सेवेच बीजारोपण करण्यात हा पक्का वस्ताद आहे. म्हणूनच मी त्यांना कोल्हापूरचा वन’मल्ल’ अस म्हणतोय.

दि.२० ते २४ मे २००९ दरम्यान बी.एन.एच.एस. व ताडोबा व्याघ्र प्रकल्पाद्वारे आयोजित राज्यस्तरीय ताडोबा महोत्सवात माझी आणि सुहास वायंगणकर यांची पहिली भेट झाली. बी.एन.एच.एस.चे सहायक संचालक श्री.संजय करकरे यांनी महाराष्ट्रातून बोलावलेल्या विषयतज्ञांमध्ये आमचा सहभाग होता. सुहास, धर्मराज, राहुल, कृतार्थ आणि संजय करकरे अशी आमची जबरदस्त टीम जमली. महाराष्ट्रातील ३३ जिल्ह्यातील राष्ट्रीय हरित सेनेच्या मास्टर ट्रेनर व विद्यार्थ्यांना निसर्ग शिक्षणाचे धडे देतांना सुहासला पहिल्यांदा पाहून मी पुरता भारावून गेलो. बोलण्याचा अस्सल कोल्हापुरी बाज आणि प्रचंड माहितीचा भांडार अशी ती सुहासची छाप माझ्या मनावर आजतागायत कायम आहे. सुहास न कंटाळता सतत व सर्वकष माहिती देत होता. “ निसर्ग संवर्धन तसेच संरक्षणासाठी तुम्ही खास पुढाकार घेतला पाहिजे. तुमच्या पेशाचा उपयोग हा निसर्गाचा अमुल्य साठा वाचविण्यासाठी झाला पाहिजे.” अस तो नेहमी विद्यार्थी व शिक्षकांना ठासून सांगतो.

सुहास वायंगणकर यांनी शिवाजी विद्यापिठातून एम. कॉम. पूर्ण केलंय. पर्यावरण शिक्षणात पदविका उत्तीर्ण केल्यानंतर विश्व प्रकृति निधीच्या कोल्हापूर विभागामध्ये सहाय्यक शिक्षण अधिकारी म्हणून १० वर्ष काम केल आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगाल नंतर भारतात सर्वाधिक निसर्ग मंडळे कोल्हापूर विभागात त्यांनी निर्माण करण्यात आपली ताकद पणाला लावली. सुहास यांना आजवर सहा पुरस्काराने सन्मानित करण्यात आल आहे. ते दोन पुस्तकांचे सहलेखक असून आजवर त्याचे ५० हून अधिक लेख विविध वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले आहेत. अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थाबरोबर सुद्धा काम केलं आहे. पश्चिम घाट व गोवा भागात निसर्ग शिक्षणाची फळी उभारण्यात सुहास यांचा मोठा वाटा आहे. वन्यजीव व पर्यावरण या विषयावर सादरीकरण, जंगल भागात क्षेत्र भेटी, वन प्रशिक्षण कार्यशाळा, जंगलफेरी, पक्षीनिरीक्षण आदीबाबत विविध शाळां व महाविद्यालयात फुलपाखरू उद्यान निर्मिती, पाणी संवर्धनासाठी शोषखड्डा बनविणे, स्थानिक झाडांच्या बिया गोळा करून बीज बँक तयार करणे व त्या माध्यमातून रोपवाटिका बनविने, लोक जैवविविधता नोंदवही इ. मध्ये सुहास यांनी पर्यावरण शिक्षणाची मोठी फळी उभी केली आहे. वनसंपदा म्हणजेच वनस्पती, जंगल, सस्तन प्राणी, पक्षी, फुलपाखरे आणि त्यांचा सहसंबंध, त्यांच्या पायांचे ठसे व इतर खाणाखुणा आदीवर सुहास आपल्या सुहास्य शैलीत सहज उलगडून सांगतो. त्यांच्या गोड शैलीत लहानथोर असे सगळेच तल्लीन होऊन ऐकतात.

सन २००९ हे वर्ष सुहासच्या आयुष्यातले खऱ्या अर्थाने सुवर्ण वर्ष आहे. वैश्विक तापमान वाढ व वातावरण बदल हा खरा निसर्गाला धोका आहे. यावर सर्वांनी एकत्र होऊन काम केलं पाहिजे म्हणून जनजागृती आवश्यक आहे. लोकसहभाग मिळाला तरच निसर्ग संवर्धन शक्य आहे. याचा भावनेतून सुहासने कोल्हापूर ते तिरुपती हे ७५० कि.मी. अंतर पायी चालत विविध शाळांमध्ये जनजागृती केली. न तुडववेल्या वाटेवरचा हा निसर्गवेडा तुडवलेल्या वाटेवर ७५० किमी चालून जनजागृती साठी धडपड करतो यातून त्याच्या निसर्गप्रेमाची आपण कल्पना करू शकतो. आजवर एकूण ३० फुलपाखरू उद्यान निर्मिती व औद्योगिक वसाहती मध्ये वृक्षारोपण करण्यात सुहास यांनी पुढाकार घेतला आहे. ‘पश्चिम घाटातील दुर्मिळ व संकटग्रस्त तसेच प्रदेशनिष्ठ वनस्पती लावण्यासाठी पुढाकार, पर्यावरण शिक्षण व संवर्धन, लोकसहभाग आणि संरक्षण या भूमिकेतून स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन त्यांचे पारंपारिक ज्ञान वापरून पर्यावरणाचे काम अधिक सकारात्मक पद्धतीने करता येते’ या सुहासच्या ब्रम्हवाक्यात त्याच्या निसर्गप्रेमाच बीज दडलंय अस मला वाटते. स्थानिक झाडांच्या रोपनाला प्राधान्य, पाणी, माती, झाडांचे सोप्या पद्धतीने जतन करणे अश्या वेगवेगळ्या अंगाने सुहास यांची भूमिका महत्वाची आहे. जिथे कुस्तीचे धडे गिरविले जातात व ज्या कोल्हापुर जिल्ह्याने आपल्या देशाला ‘हिंद केसरी’ व ‘महाराष्ट्र केसरी’ सारखे मल्ल दिलेत. त्याच ठिकाणी सुहास निसर्गसेवेचे धडे देऊन निसर्गासाठी कार्य करणारे मल्ल’ तयार करण्याच महान कार्य करीत आहेत हे मला अधिक कौतुकास्पद वाटतं.

@ यादव तरटे पाटील

     वन्यजीव अभ्यासक,

     दिशा फाउंडेशन, अमरावती

     संपर्क- ९७३०९००५००

disha.wildlife@gmail.com

www.yadavtartepatil.com

 

 

Yadav

Auther is a Member of Maharashtra State Board for Wildlife, wildlife conservationist, eminent nature activist, columnist & working for wildlife, environment & for tribal youth since 20 years. He is also working for anti-poaching, green administration & green journalism. He is also Founder of Disha foundation, Amravati based Organisation.

Recent Posts

तरुणांनो वन्यजीवांची हाक ऐका…..!

वन्यजीव संवर्धन ही सर्वच देशातील नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आहे. विशेष करून तरुणांची यात महत्वाची भूमिका…

4 years ago

मी चष्मेवाला

मी आहे चष्मेवाला..! पण मी चष्मा नाही लावत बर का..? आणि हो मी ‘मामा की…

4 years ago

वेडा नसलेला ‘वेडा राघू’

छोटा पाणपोपट हा पक्षी वेडा राघू नावानेच अधिक परिचित आहे. या पक्ष्याच आपण 'वेडा राघू'…

4 years ago

फ्रेंडशिप डे निसर्गाचा…!

एका गावात एका मुलीला उडणारे पक्षी खूप आवडायचे, पण एक दिवस राजा अचानक पक्षी मारायचं…

4 years ago

Beauty with Poison…!

Are butterflies poisonous? You will be perplexed if you ask this question. We know that…

4 years ago

सौंदर्यात दडलंय विष…!

फुलपाखरे विषारी असतात का.? हा प्रश्न विचारला तर तुम्ही नक्कीच बुचकळ्यात पडाल. साप, विंचू व…

4 years ago