भारताचा बांबूमॅन : सैयद सलीम
दुर्दम्य इच्छाशक्ती, कामाप्रती असलेली निष्ठा व सातत्य असले कि जगातील कुठलीही गोष्ट अशक्य नाही. जगभर अनेक कलाकृती निर्माण झाल्यात त्या यातूनच…! त्यातल्या त्यात भारतात तर असे अनेक मानवी चमत्कार आपल्याला पहावयास मिळतात. म्हणतात ना की, माणसेच बदल करू शकतात. समाजमनाच्या मानसिकतेवर पाहता पाहता त्यांचा पगडाही निर्माण होतो. कोणत्याही कामाची सुरवात स्वतापासून केल्यावरच हे सर्व शक्य होते. अश्या कर्तुत्वाला नाविन्यपूर्ण संकल्पना व कौशल्यतेची साथ मिळाली तर एखादी कलाकृती जन्म घेणार नाही तर नवलच….! ही कथा आहे अश्याच एका ध्येयवेड्या माणसाची व त्याच्या प्रयत्नातून निर्माण झालेल्या भारतातील पहिल्या बांबू उद्यानाची…! ही कथा आहे महाराष्ट्राच्या बांबूमॅन सैयद सलीम अहमद यांची….!
अमरावती शहराला लागून असलेल्या वडाळी परिसरात वन विभागाची वडाळी रोपवाटिका आहे. मात्र वडाळी रोपवाटिका ते प्रसिद्ध बांबू उद्यान हा प्रवास थक्क करणारा आहे. अमरावती शहरालगत असलेला हा परिसर म्हणजे कुत्री व डुकरांची हक्काची जागा, इतकच काय तर शौकीनांचीही हक्काची पार्टी करण्याची जागा…! सन १९९३ मध्ये एक वनरक्षक तिथे रुजू झाला अन हळूहळू या जागेची कायापालट व्हायला सुरवात झाली. आज त्या जागेवर फिरतांना जुन्याच सोन झालं अस वाटते. जुन्या कटू आठवणी कायमच्या पुसल्या गेल्या आहेत. कचरा अन केवळ कचराच करणाऱ्या माणसांच्या जागेत आता हिरवाई नांदत आहे. बांबूच्या बेबटांची करकर अन बांबूच्या पानाची सळसळ कानाला आणि मनाला सुखावणारी आहे. खर म्हणजे कोणताही बदल एका झटक्यात होत नसतो, बांबू उद्यानही त्यातलेच एक उदाहरण म्हणता येईल. एक एक प्रजातीचे संगोपन करत तब्बल ६३ प्रकारच्या प्रजातींचे संकलन आजवर येथे करण्यात आले आहे. भारतातील पहिल्या ठरलेल्या या बांबू उद्यानात आज जगभरातील एकूण ६३ प्रकारच्या बांबू प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये भारतातील ५५ व विदेशातील ८ प्रकारच्या बांबू प्रजातींचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात महाराष्ट्रातील फक्त १० प्रजातींचा समावेश आहे. जगातील ३५० प्रजातीपैकी व भारतातील १३४ प्रजातीपैकी एकट्या महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात प्रजातींचे संगोपन करून त्या जगविणे खरोखरच ब्रम्हप्रयत्न म्हणावे लागतील. आसाम आणि मणिपूर भागासारख्या थंड प्रदेशात आढळणाऱ्या बांबूच्या प्रजातीला विदर्भाच्या कडक उन्हात जगविणे सोपे काम नाहीच. मात्र हे देखील त्यांनी करून दाखविलं. आपल्या कर्णमधुर आवाजांनी कानाला भुरळ पाडणारी बासरी आपल्याला माहीतच आहे. ज्यापासून बासरी तयार केली जाते तो बांबू, रांगणारा बांबू, सर्वात ऊंच बांबू, सर्वात मोठा बांबू, काटेरी बांबू, लोणच्याचा व भाजीचा बांबू, फांदी नसलेला बांबू असे एक ना अनेक प्रकार अगदी सुटसुटीत पद्धतीने येथे आपल्याला पाहायला मिळतात. बांबू उद्यानातील प्रत्येक प्रजातीवर शास्त्रीय नाव व माहितीचे फलक लावले असल्याने प्रतके प्रजाती कशी वेगळी आहे हे सहज लक्षात येते. सैयद सलीम अहमद यांची चिकाटी यातून स्पष्ट होते.
सुपीक मनातून निर्माण झालेल्या बांबू उद्यानात प्रवेश करताच हिरवळ आपल लक्ष वेधून घेते. नयनरम्य दृश्य पाहून मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. स्वतचे छंद बाजूला ठेऊन केवळ बांबू एके बांबूचा जप करून पोटच्या पोराप्रमाणे बांबू जपणाऱ्या सैयद सलीम यांच कौतुक करावे तितके कमीच…! सन १९८४ मध्ये मेळघाट सारख्या दुर्गम भागात रुजू होऊन सेवा देणारा हा अवलिया पुढे इतका मोठा चमत्कार करेल अशी कुणाला कल्पनाही आली नसेल. एकीकडे लोकसेवकाला काम करण्यात मर्यादा येतात असाच समज आहे, मात्र या समजाला फाटा देत एका वनपालाने ही किमया केली. वडाळी रोपवाटीकेचे वनपाल श्री. सय्यद सलीम यांच्या प्रयत्नांना आज यश आले आहे. कोणताही बदल प्रशासकीय मानसिकता असेल तरच होऊ शकतो. श्री.सलीम यांच्या प्रयत्नांना आजवर अनेक वनाधिकाऱ्यांची साथ दिली खरी, पण काहिनी त्यांचे पायही ओढले. मात्र तत्कालीन उपवनसंरक्षक कु. नीनु सोमराज यांच्या कार्यकाळात या कामाला सुरवात झाली. बांबू नर्सरी ते बांबू उद्यान या प्रवासाला मूर्त रूप देण्यात उपवनसंरक्षक श्री. हेमंतकुमार मीना यांचाही मोलाचा वाटा आहे.
बांबू उद्यान परिसरात आपल्याला बांबूच पाहायला मिळत नाही तर उद्यानात असणारी सर्व खेळणी देखील आपले लक्ष वेधून घेते. आपल्या कल्पकतेला जोड देत श्री.सैयद सलीम यांनी एक एक कलाकृती जन्माला घातली. बांबूचा पाळणा, बांबूचा झुला, बांबूचा बोगदा, बांबूचा झोक्यासह येथे सर्व आकर्षण आहेत. लहान मुले तर सोडाच चक्क मोठीही मंडळी देखील येथे खेळण्यात दंग होऊन जातात. बांबू उद्यान केवळ बांबू प्रजातींचे संगोपन करणारेच उद्यान नसून हे बांबूचे संवर्धन, संशोधन व शिक्षण या दृस्तीनेही महत्वाचे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, वनमंत्री मा. सुधीर मूनगंटीवार, प्रसिद्ध समाजसेविका व अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी येथे भेटी दिल्या आहे. बांबू उद्यान व येथील परिसर वन्यजीव व पर्यावरण संवर्धन मार्गदर्शन केंद्र म्हनुनही महत्वपूर्ण आहे. बांबू उद्यान परिसरात एकूण एकूण २३० प्रकारच्या जैवविविधते अंतर्गत असलेल्या प्रजातींचे माहितीसह फलक मी विनामुल्य दिले आहे. दि.१ जानेवारी २०१७ रोजी या उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. श्री सैयद सलीम यांच्या सुपीक डोक्यातून आलेली शेतकर्यांसाठी मार्गदर्शक ठरलेली बांबू शेती व त्यावर आधारित उद्योग यावरच्या येथील कार्यशाळा वैशिष्ठ्यपूर्ण आहेत. जगात बांबू उत्पादन व वापरात चिनचा पहिला क्रमांक लागतो. चिनमध्ये बांबूच्या ३४० हून अधिक प्रजाती आहे. चिनमध्ये बांबू पासून कापड, साबण, विविध गृहपयोगी वस्तू, शरबत व इतर पेय बनविले जातात. भारताची त्या दिशेने वाटचाल सुरु झाली तर अर्थकारणात नक्कीच सक्रीय बदल होतील. भविष्यात प्लॅस्टीक वापराला आळा घालण्याचे सामर्थ्य केवळ बांबू ह्या एकाच गवत प्रजातीत आहे. भारताच्या शाश्वत विकासाच्या प्रवासात बांबू हा खऱ्या अर्थाने एक मैलाचा दगड ठरू शकतो. फक्त आता त्या दृष्टीने राजकीय व प्रशासकीय प्रयत्नांची गरज असल्याचे शेख सलीम यांना वाटते. ते सध्या अमरावती येथे वनपरिक्षेत्र अधिकारी (शिकार प्रतिबंधक दल) म्हणून कार्यरत आहेत. नुकताच त्यांना वनराई फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य वनरक्षक व वनपाल संघटना नागपूर यांच्या वतीने दिला जाणारा स्व. उत्तमराव पाटील स्मृती वन संवर्धन पुरस्कार जाहीर झाला आहे. एक सहृदय जेष्ठ मित्र आणि सच्चा वनाधिकारी म्हणून मला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो.
@ यादव तरटे पाटील
दिशा फाउंडेशन, अमरावती
संपर्क- ९७३०९००५००
Hi
You have done a very good job by giving these local hero’s their much deserved recognition. The way of presentation is very fine.
I wish you a the best for your future endeavours and would like to see many more from our society.
Thank you very much Sir
thank you for valuable words. i will do the needful as you given best wishes to me.