मेळघाटी ‘वन’कोश :  रविंद्र वानखडे

मेळघाटी ‘वन’कोश :  रविंद्र वानखडे 

मी रानवेडा, जंगलात भटकनारा, जंगल प्रेमात कायम बुडालेला, डोळ्यातल्या हिरवाईसह रानातल्या भन्नाट अनुभवाचा ठेवा असेलेला मी….! जंगलात हिंडताना त्याविषयी अधिक संवेदनशील बनलो. वने व वन्यजीव केवळ समजूनचं न घेता त्यात जगायला लागलो. वनखात्यात अधिकारी होणार असे मनातही नव्हते पण माझ्या भोवताली एक तेजोवलय आहे. माझा जन्मच जणु वनांसाठी झाला की काय असे मला वाटत राहते. वनविश्वाच्या खोलात जाऊन ते कसे समजून घ्यावे याचा जणु वस्तूपाठचं माझ्या मनात मी ठरविलाय. मेळघाट खऱ्या अर्थाने माझा जीव की प्राण…! माझ्या नावाचा परिचय भारतभर असूनही माझे पाय मात्र कायम जमिनीवरच…! मेळघाट, निसर्गाने मुक्तहस्ते सृष्टीसौंदर्याची उधळण केलेलं वसुंधरेचं हिरवं लेणं..! मेळघाट शब्द उच्चारताच माझ्या मनात वाघोबाच्या डरकाळीपासुन ते मुंग्यांच्या वारुळापर्यंतच्या अनेक आठवणी मनात कायमच्या घर करून आहेत. जीवसृष्टीला आकार देऊनही निर्गुण निराकार जंगलातूनच मानवजातीला जिवंत राहण्याचे तंत्र, जीवन सुखी करण्याचे यंत्र, आणि जीवनाचं सार्थक करण्याचे मंत्र मला येथेच गवसलेत. जंगलाकडून हे सगळं घेत असतांना आपणही जंगालाचं काहीतरी देणं लागतो हे कायम माझ्या मनात ठेऊन जगणारा वनाधिकारी म्हणजे मी रविंद्र वानखडे होय.

दोन वर्षाचा विक्रांत आणि त्याला १०२ ताप असतांना माझ्या हाती क्रोसिनची गोळी देऊन मला जंगलात जाव लागतंय, तिकडे आग लागली आहे, आणि मी आजच परत येतो. अस म्हणून दोन दिवस आलेच नाही, अस एकदा नाही अनेकदा घडलेल्या प्रसंगांना उजाळा देताना सौ.नीलिमा काकुंचे डोळे पाणावतात. यांच जीवन म्हणजे केवळ जंगल एके जंगल…! अस त्या म्हणतात खऱ्या पण खर तर ही त्यांचीच पुण्याई की सर जंगलाला न्याय देऊ शकले. फुलपाखराला दोन पंख असतात तर संसाराच्या गाडीलाही दोन चाक असतात. नीलिमा काकू त्यात प्राध्यापिका आणि वनाधिकारी असून असूनही त्यांनी आपल्या दोन्ही मुलांचा साभाळ उत्तम केलाय. सर आपल्या वनकर्तव्यात कायम व्यस्त असतांना सौ. नीलिमा वानखडे यांनी अख्या संसाराची धुरा पेलली हे इथे विशेषत्वाने नमूद करावासे वाटते.

सन १९८४ मध्ये श्री. रविंद्र वानखडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र वनसवेत ‘सहायक वनसंरक्षक’ म्हणून निवड झाली. नियुक्तीनंतर त्यांनी कोईम्बतूरला दोन वर्षाच प्रशिक्षण पूर्ण केलं. दि.३ जानेवारी १९८६ मध्ये ते बुलढाणा व तदनंतर सहा महिने त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे सेवा दिली. भारतीय वन्यजीव संस्था देहरादून येथून वन्यजीव संवर्धनाच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी जळगाव खानदेश येथे दीड वर्ष सेवा दिली. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात जन्मलेल्या रविंद्र वानखडे यांच आयुष्य कुठल्याही दंतकथेपेक्षा कमी नाही. मेळघाटात राज्य चालतं ते तापी व सिपना नदिचं. बावीस वर्षापुर्वी याच सिपनेच्या पात्राजवळून सेमाडोह पासून सुरू झालेली त्यांची मेळघाटातील वनसेवा म्हणजे एक इतिहास आहे. आजही अख्खा मेळघाट पायी फिरून पालथा घालणारा एकमेव अधीकारी म्हणून त्यांची ओळख अबाधित आहे. एक एक पाणवठा आणि एक एक वनक्षेत्र मुकपाठ असलेल्या वानखडे सरांना मेळघाटची इत्यंभूत माहिती आहे. मेळघाटला आणि येथील वन्यजीवांना खऱ्या अर्थाने समजून घेणारा अधिकारी म्हणून मी त्यांचा उल्लेख करेल. त्यांची मेळघाटची सेवा म्हणजे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकरिता सुवर्णकाळ म्हटल्यास वावग ठरू नये. म्हणूनच सरांना आम्ही ‘मेळघाटचा इनसायक्लोपिडिया’ ही उपाधी दिली आहे. पुढे ऑक्टोबर १९९० ते १९९७ पर्यंत मेळघाट मध्ये सहायक वनसंरक्षक म्हणून सेवा देतानाच विभागीय वनाधिकारी म्हनून त्यांची बढती झाली. या दरम्यान सरांनी अमरावती येथील कार्यआयोजना कार्यालयात सेवा दिली. सप्टेंबर १९९७ ते मे २००० पर्यंत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक म्हणून त्यांनी कामकाज पहिले. मे २००० पासून ऑक्टोबर २००४ दरम्यान वन प्रशिक्षण संस्था चिखलदरा येथे ते संचालक म्हणून होते आणि तेथे त्यांनी मोलाची भूमिका पार पडली. ऑक्टोबर २००४ ते जुलै २००९ मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक म्हणून कार्य करतांना सरांची कारकीर्द उत्कृष्ठ वन्यजीव व्यव्स्थापनाच्या दृष्टीने स्मरणात राहणारी आहे. सन २००९ ते सन २०१३ दरम्यान त्यांनी महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ येथे विभागीय व्यवस्थापक म्हणून कामकाज केले. पुढे २०१३ ते २०१७ मेळघाटमध्ये सेवा देत असतांनाचा एप्रिल २०१७ मध्ये त्यांची बढती होऊन ते ‘वनसंरक्षक’ म्हणून सामाजीक वनीकरण विभाग अमरावती येथे रुजू झालेत. नोव्हेंबर २०१७ मध्ये बदली होऊन ते पुणे वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक आणि आता यवतमाळ येथे मुख्य वनसंरक्षक म्हणून कार्यरत आहेत.

अमरावती जिल्ह्यात जन्मलेल्या वानखडे सरांनी चौथी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत घेतले. पुढे सातारा येथे सैनिक शाळेत १२ वी पर्यंत शिक्षण घेऊन विज्ञान विषयात अमरावतीच्या विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतून त्यांनी पदवी पूर्ण केली. भौतिकशास्त्र विषयात एम.एस.सी. करतांना व सैनिक सेवेत जाण्याची तयारी सुरु असतांनाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून सहायक वनसंरक्षक या वर्ग एक पदी त्यांची निवड झाली. तदनंतर त्यांनी एल.एल.बी. देखील पूर्ण केले. वन प्रशिक्षण कालावधीत त्यांना सुवर्ण पदक प्राप्त झाले होते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकरिता उत्कृष्ठ वन्यजीव व्यवस्थापन नियोजनाबद्दल त्यांनी सुवर्ण पदक देखील मिळालेलं आहे. सन १९९० ते १९९७ दरम्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पात संशोधन अधिकारी म्हणून कार्य करतांना बाबासाहेब ढोरे यांच्या सोबत काम करतांनाचे दिवस अधिक आठवणीत असल्याचे ते सांगतात. वनस्पती व प्राण्यांची खऱ्या अर्थाने मैत्री याच काळात अधिक फुलात गेल्याचे ते आवर्जून सांगतात. व्याघ्र गणनेचा त्यांचा अनुभव सर्वोत्कृष्ठ असल्याचे ते नेहमी म्हणतात. कुठलाही बडेजाव न करता प्रत्यक्ष वन अधिवासात मचाण व संरक्षक कुटीवर मुक्काम करणे, वनरक्षकाबरोबर पायी गस्त करणे हे सरांच्या आवडीच काम..! वातानुकुलीत आलिशान गाडीच्या खिडकीचा काच उघडून जंगल न पाहता नेहमी जंगल पायीच फिरतात. वरिष्ठ वनाधिकारी असूनही इतकी पराकोटीची तळमळ असणारे व्यक्ती अधिकारी आज शोधूनही सापडत नाही. तळागाळात जाऊन आणि स्टाफ सोबत मिसळून काम केल्याशिवाय वन विभाग समजूच शकत नाही अस त्यांना वाटतं. त्यांची ही कार्य करण्याची शैली सर्वश्रुत व वैशिष्ठ्यपूर्ण आहे. सन १९८९, १९९३ व १९९७ मधील व्याघ्र गननेचा माहितीचे मूल्यमापन करण्याचा अनुभव त्यांच्या खूप आवडीचा असल्याचे ते सांगतात. वनरक्षकाच्या खांद्याला खांदा लाऊन वनवनवा विझविन्यासाठी स्वतः जाणे, गावकरी यांचेशी कायम संपर्कात राहणे, पैश्याच्या लोभापासून दूर राहणे, वनसंवर्धन, वनप्रशिक्षण, वनप्रशासन अश्या वेगवेगळ्या अंगाने उत्कृष्ठ व प्रामाणिक कार्य करणाऱ्या रविंद्र वानखडे यांना मानाचा मुजरा…! खर म्हणजे आपल्या संपूर्ण आयुष्याच वानप्रस्थ आणि वनप्रस्थ करून दररोजच निस्वार्थ सेवा करणा-या या अवलीया अधिकाऱ्याच अरण्यक असंच सुरू राहणार आहे. जे असतील त्यांच्यासह, जे नसतील त्यांच्याशिवाय…!

@ यादव तरटे पाटील,

     दिशा फाउंडेशन, अमरावती

संपर्क – ९७३०९००५००

     disha.wildlife@gmail.com

www.yadavtartepatil.com

Yadav

Auther is a Member of Maharashtra State Board for Wildlife, wildlife conservationist, eminent nature activist, columnist & working for wildlife, environment & for tribal youth since 20 years. He is also working for anti-poaching, green administration & green journalism. He is also Founder of Disha foundation, Amravati based Organisation.

Recent Posts

तरुणांनो वन्यजीवांची हाक ऐका…..!

वन्यजीव संवर्धन ही सर्वच देशातील नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आहे. विशेष करून तरुणांची यात महत्वाची भूमिका…

4 years ago

मी चष्मेवाला

मी आहे चष्मेवाला..! पण मी चष्मा नाही लावत बर का..? आणि हो मी ‘मामा की…

4 years ago

वेडा नसलेला ‘वेडा राघू’

छोटा पाणपोपट हा पक्षी वेडा राघू नावानेच अधिक परिचित आहे. या पक्ष्याच आपण 'वेडा राघू'…

4 years ago

फ्रेंडशिप डे निसर्गाचा…!

एका गावात एका मुलीला उडणारे पक्षी खूप आवडायचे, पण एक दिवस राजा अचानक पक्षी मारायचं…

4 years ago

Beauty with Poison…!

Are butterflies poisonous? You will be perplexed if you ask this question. We know that…

4 years ago

सौंदर्यात दडलंय विष…!

फुलपाखरे विषारी असतात का.? हा प्रश्न विचारला तर तुम्ही नक्कीच बुचकळ्यात पडाल. साप, विंचू व…

4 years ago