एक चिमुकला मुक्तानंद शाळेत शिकत होता. कोवळ्या वयातच टारझनच्या जंगल कथांचे सोळा भाग एका झटक्यातच त्याने वाचून काढले. त्याच्या बालपणाच सार विश्वचं या ‘टारझन’ च्या अवती-भवती पिंगा घालणारं…! निबिड अन घनदाट जंगल, तेथील प्राणी, पक्षी अन या सर्वावर अगदी लीलया स्वार होणारा ‘ड्रीम मॅन’ म्हणजेच ‘टारझन’ …! या पात्रान या चिमुकल्याच्या बालमनावर पार गारुड घातलं होत. त्या कथांच्या वर्णनाने अक्षरशः तो झपाटलाच…! झाडावर घर बांधायचं, कंदमुळे खायची, हे एकच खूळ डोक्यात होत, या खुळापायी तो पार झपाटला होता. टारझन प्रमाणेच आपण आफ्रिकेच्या जंगलात जाऊन वाघाला पकडायच अस तो मनोमनी ठरवू लागला. झाडावर चढायचा तो सरावही करू लागला. चार आणे, आठ आणे करत करत ‘गल्ला’ भरायला सुरवात झाली. लागलीच कोवळी बोट जगाच्या नकाशावर फिरू लागली. कोवळ्या पायांची वाघाच्या भूमीत समुद्रापार जाऊन वाघाला पकडायची योजना हळूहळू रंगात यायला लागली. लहान भाऊ व एक मित्र सुद्धा या दिव्य स्वप्नाच्या मोहात पडले. नाशिक जिल्ह्यातील येवल्यातील या तीन चीमुकल्यांनी एक भन्नाट प्रवासाची योजना आखली. इयत्ता सहावी मध्ये असतांना गल्ला फोडून जमा झालेले २७ रुपये घेऊन तिघे निघाले टारझनच्या जंगल सफारीला….! धावत पळत २७ किलोमीटर अंतर पार केले. मध्यरात्री झाली, लहान भाऊ पंकज रडू लागला, त्याला भूक लागली म्हुणून खायचं शोधण्यासाठी या तिघांनी रवंधा बस स्थानक गाठले. तर दुसरीकडे निवडणुकीचा काळ होता, वडील मुख्याधिकारी होते. आईच्या मनात वेगळीच शंका येत होती. आपली मुले कुणी पळवली तर नाहीना या विचाराने ती व्याकुळ झाली होती. श्री. हनुमंत माळी हे लोकाभिमुक अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जनसंपर्क चांगला होता. तिघेही विशेष रंगाचा हाफ प्यांट घालून असल्यामुळे पटकन लक्षात आले. रवंधा येथील बस स्थानकावर एका अग्निशामक कर्मचाऱ्याने यांना पटकन ओळखले. मुक्तानंद शाळेत व गावात या तिघांची आजही ख्याती आहे. ‘वाघ पकडायला गेलेली पोरं’ म्हणूनच हे ओळखल्या जाते. या अचाट ‘करामती’ करणाऱ्या माणसाच नाव जाणून घ्यायची तुमची उत्सुकता ताणल्या गेली असेल ना..! तर ही गोष्ट आहे जिगरबाज वनाधिकारी श्री. विशाल हनुमंत माळी याची…!
विशाल हनुमंत माळी हे सध्या विभागीय वनाधिकारी म्हणून मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथे कार्यरत आहे. नावातच ‘विशाल’ नाही तर कर्तुत्वही तसेच, पवनसुता प्रमाणेच ‘हनुमंत’रावांचे सुत व वाघाला आपल्या जीवाप्रमाणे जपणारे या अर्थाने सुद्धा जंगलाचे ‘माळी’ म्हणूनच मी त्यांचा परिचय देईल. मेळघाट व मध्य भारतातील वाघ शिकार प्रकरणी एक नव्हे तर तब्बल ९७ आरोपींच्या मुचक्या आवळण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. वनगुन्हे व आधुनिक तंत्रज्ञान याची त्यांनी उत्तम सांगड घातली. केंद्रीय गुप्तचर यंत्रणा (CBI) व वरीष्ठ वनाधिकारी यांच्या सोबत उत्तम समन्वय साधून काम करण्याची त्यांची लकब वाखाणण्याजोगी आहे. इतकेच नव्हे तर अप्रत्यक्षरित्या जवळपास १५० चे वर शिकार व इतर प्रकरणातील आरोपी जेरबंद करण्यात त्यांची मोलाची भूमिका आहे. महाराष्ट्र वन सेवेत दाखल होताच त्याच्या कामाच्या शैलीने संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारत हादरून गेला. भारतातील पहिल्या व मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ‘वन्यजीव गुन्हे शाखेची’ सहायक वनसंरक्षक असतानाच धुरा लीलया सांभाळळी. विशाल माळी या अवलिया वनाधीकाऱ्याची कामाची सिंघम शैली पाहता पाहता प्रसिद्ध झाली. मेळघाट सारख्या दुर्गम भागात एक तर कुणी सेवा द्यायला तयार होत नाही. सहायक बनसंरक्षक म्हणून येथे काम केले अन पाहता पाहता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे कौतुक जगभर व्हायला लागले. वाघ शिकार प्रकरण म्हटलं कि भल्याभल्यांची तारांबळ उडते. स्वतःच्या जीवाची अन घरदाराची पर्वा न करता वाघ शिकार प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळविले. नुसता छडाच लावला नाही तर शिक्षा होऊन त्यांची तुरुंगात रवानगी होईपर्यंत हिमतीने व चिकाटीने पाठपुरावाही करण्यात ते तरबेज आहे. मध्यप्रदेश, पंजाब, ओरिसा सारख्या भागात जाऊन आरोपींना अटक केली.
विशाल माळी हे मुळचे अहमदनगर येथील रहिवासी असून सुद्धा स्वगृही जाण्याची कल्पना त्याच्या डोक्याला शिवत नाही. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाचा उत्कृष्ठ वनाधिकारी म्हणून सुवर्णपदकाचेही मानकरी ते ठरले आहे. यासह वन्यजीव संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल ‘कार्ल झीस’ चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला. मा. न्यायालयाची तारीख असल्यामुळे ती महत्वाची आहे, जर आपण गेलो नाही तर याचा आरोपी फायदा घेतील म्हणून आपली खाते परीक्षा देऊ न शकणारा हा दुर्मिळ अधिकारी म्हणून विशेष अभिमान वाटतो. दिवस असो की रात्र, पाऊस असो की उन हा अधिकारी मी नेहमी कामासाठी सदैव तप्तर असतो. मेळघाट मध्ये आम्ही वेगवेगळ्या संकल्पना राबवून शिकारी आणि धूडघुस घालणाऱ्या पर्यटकांना आजवर अनेकवेळा धडा शिकविला आहे. एक दिवस तर आम्ही भर पावसात मेळघाट व्याघ्र प्रकल्पात मद्यप्राशन करून धिंगाणा घालणाऱ्या अनेकांना ताकीद देऊन, उपद्रव शुल्क स्वरुपात दंड करून आणि प्रसंगी कारवाई देखील केली. याचा परिणाम असा झाला की मेळघाटात पर्यटक येतात मात्र शिस्तीत पर्यटनाचा आनंद घेतात. यातून मद्यपी आणि हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकवर अंकुश लागला. तब्बल ९० किलो वजन असलेला हा तरुण पायी फिरण्यात सुद्धा वस्ताद आहे. मेळघाटच्या निबिड जंगलात गस्ती करताना व शिकाऱ्यांची माहिती मिळताच आम्ही धावत सुटायचो. विशेष म्हणजे आम्ही नियमीत गस्त करायचो. जिगरबाज मित्र व शिकाऱ्यांचा शिकारी विशाल माळी यांच्या सोबत केलेल्या अनेक शिकार विरोधी मोहिमेतील आठवणीं आजही मेळघाटच्या कुशीत दडलेल्या आहेत. त्या सर्व आठवणी आजही मनात तरळत असतात. मेळघाटात पाय ठेवताच मला मेळघाटचं जंगल बोलू लागतं…! ऐकटाच आलास का रे…? तुझा सोबती कुठे आहे…? मी मात्र निरुत्तर होऊन जंगलाच्या रानवाटेने मार्गस्थ होतो.
मेळघाटच्या वाघासाठी वाघाच काळीज घेऊन काम करणाऱ्या विशाल माळी यांची कारकीर्द मेळघाट साठी अमर राहील. मेळघाटच्या जंगलात वाघाला मोकळा श्वास देणाऱ्या या वनाअधिकाऱ्याला माझा सलाम….! विभागीय वनाधीकारी विशाल माळी यांच्यासाठी सरतेशेवटी एका अनामिकाच्या काही ओळी आठवतात की,
“ खुलूस और प्यार के वो मोती लुटाता चलता है,
वो शख्स जो जंगल को अपने गलेसे लगाके चलता है,
हम उसके कद का अंदाजा करे भी तो कैसे,
वो आसमाँ है मगर सर झुका के चलता है…!”
तूर्तास इतकंच…..! जय हिंद, जय कुला, जय मेळघाट……!
@ यादव तरटे पाटील,
दिशा फाउंडेशन, अमरावती
disha.wildlife@gmail.com
www.yadavtartepatil.com