भारतातील पहिले बांबू उद्यान

दुर्दम्य इच्छाशक्ती, कामाप्रती असलेली निष्ठा व सातत्य असले कि जगातील कुठलीही गोष्ट अशक्य नाही. जगभर अनेक कलाकृती निर्माण झाल्यात त्या यातूनच…! त्यातल्या त्यात भारतात तर असे अनेक मानवी चमत्कार आपल्याला पहावयास मिळतात. म्हणतात ना माणसेच बदल करू शकतात. समाजमनाच्या मानसिकतेवर त्यांचा पगडा निर्माण होतो. कोणत्याही कामाची सुरवात स्वपासून केल्यावरच हे सर्व शक्य होते. अश्या कर्तुत्वाला नाविन्यपूर्ण संकल्पना व कौशल्यतेची साथ मिळाली तर एखादी कलाकृती जन्म घेणार नाही तर नवलच….! ही कथा आहे भारतातील पहिल्या बांबू उद्यानाची…!

अमरावती शहराला लागून असलेल्या वडाळी परिसरात वन विभागाची वडाळी रोपवाटिका आहे. मात्र वडाळी रोपवाटिका ते प्रसिद्ध बांबू उद्यान हा प्रवास थक्क करणारा आहे. अमरावती शहरालगत असलेला हा परिसर म्हणजे कुत्री व डुकरांची हक्काची जागा, इतकच काय तर शौकीनांचीही हक्काची पार्टी करण्याची जागा होती. सन १९९३ मध्ये एक वनरक्षक तिथे रुजू झाला अन हळूहळू या जागेची कायापालट व्हायला सुरवात झाली. कोणताही बदल एका झटक्यात होत नसतो, बांबू उद्यानही त्यातलेच एक उदाहरण म्हणता येईल. एक एक प्रजातीचे संगोपन करत तब्बल ६३ प्रकारच्या प्रजातींचे संकलन आजवर येथे करण्यात आले आहे. भारतातील पहिल्या ठरलेल्या या बांबू उद्यानात आज जगभरातील एकूण ६३ प्रकारच्या बांबू प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये भारतातील ५५ व विदेशातील ८ प्रकारच्या बांबू प्रजातींचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात महाराष्ट्रातील फक्त १० प्रजातींचा समावेश आहे. जगातील ३५० प्रजातीपैकी व भारतातील १३४ प्रजातीपैकी एकट्या महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात प्रजातींचे संगोपन करून त्या जगविणे खरोखरच ब्रम्हप्रयत्न म्हणावे लागतील. आपल्या कर्णमधुर आवाजांनी कानाला भुरळ पाडणारा बासरी माहीतच आहे. ज्यापासून बासरी तयार केली जाते तो बांबू, रांगणारा बांबू, सर्वात ऊंच बांबू, सर्वात मोठा बांबू, काटेरी बांबू, लोणच्याचा व भाजीचा बांबू, फांदी नसलेला बांबू  असे एक ना अनेक प्रकार अगदी सुटसुटीत पद्धतीने येथे आपल्याला पाहायला मिळतात. बांबू उद्यानातील प्रत्येक प्रजातीवर शास्त्रीय नाव व माहितीचे फलक लावले असल्याने प्रतके प्रजाती कशी वेगळी हे सहज लक्षात येते.

बांबू उद्यानात प्रवेश करताच सगळीकडे असणारी हिरवळ आपला लक्ष वेधून घेते. बांबू उद्यानाचे दुसरे प्रवेशद्वारही बांबू पासूनच तयार केले आहे. आत शिरताच आतील नयनरम्य दृश्य पाहून मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. एकीकडे लोकसेवकाला काम करण्यात मर्यादा येतात असाच आपण बहुदा विचार करतो. मात्र या सर्व विचारांना फाटा देत एका वनपालाने ही किमया केली आहे. वडाळी रोपवाटीकेचे वनपाल श्री. शेख सय्यद सलीम यांचा यांच्या प्रयत्नांना आज यश आले आहे. कोणताही बदल प्रशासकीय मानसिकता असेल तरच होऊ शकतो. श्री. सलीम यांच्या प्रयत्नांना आजवर अनेक वनाधिकाऱ्यांची साथ दिली खरी तर काहिनी त्यांचे पायही ओढले. हे वास्तव नाकारून चालणार नाही. मात्र तत्कालीन उपवनसंरक्षक कु. नीनु सोमराज यांच्या कार्यकाळात खऱ्या अर्थाने या कामाला सुरवात झाली. बांबू नर्सरी ते बांबू उद्यान या प्रवासाला मूर्त रूप देण्यात सध्याचे उपवनसंरक्षक श्री. हेमंत’कुमार मीना यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. बांबू उद्यान परिसरात आपल्याला बांबूच पाहायला मिळत नाही तर उद्यानात असणारी सर्व खेळणी देखील आपले लक्ष वेधून घेते. विशेष म्हणजे ही सर्व खेळणी बांबू पासुनच तयार केली आहे. बांबूचा पाळणा, बांबूचा झुला, बांबूचा बोगदा, बांबूचा झोका व इतर सर्व लहान मुलांची खेळणी आकर्षक आहेत. लहान मुले तर सोडाच चक्क मोठीही मंडळी खेळण्यात दंग होऊन जातात. बांबू उद्यान परिसरात असलेले कॅक्टस गार्डन, रोपवाटिका सुद्धा पाहण्या सारखे आहे. सध्या फुलपाखरू उद्यान व कमळ उद्यान प्रस्तावित असून कामकाज सुरु झालेले आहे.

बांबू उद्यान केवळ बांबू प्रजातींचे संगोपन करणारेच उद्यान नसून येथे अनेक संशोधक सुद्धा भेट देतात. हे उद्यान बांबूचे संवर्धन, संशोधन व शिक्षण अश्या अनेक अंगाने नावारूपास येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, वनमंत्री मा. सुधीर मूनगंटीवार, प्रसिद्ध समाजसेविका व अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ अनेक मान्यवरांनी येथे भेटी दिल्या आहे. बांबू उद्यान व येथील परिसर वन्यजीव व पर्यावरण संवर्धन मार्गदर्शन केंद्र म्हनुनही महत्वपूर्ण ठरत आहेत. संपूर्ण बांबू उद्यान परिसरात एकूण एकूण २३० प्रकारच्या स्थानिक प्राणी, पक्षी, फुलपाखरे, कोळी व इतर जैवविविधते अंतर्गत असलेल्या प्रजातींचे माहितीसह फलक लावण्यात आलेले आहेत. दि.१ जानेवारी २०१७ रोजी पालकमंत्री मा. श्री. प्रवीण पोटे पाटील, आमदार मा. डॉ. सुनील देशमुख, तत्कालीन मुख्य वनसंरक्षक मा. श्री. संजीव गौर, उपवनसंरक्षक श्री. हेमंतकुमार मीना, सहायक वनसंरक्षक श्री अशोक कविटकर व यादव तरटे पाटील यांच्या उपस्थितीत या उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. गेल्या दीड वर्षात पर्यटकांच्या पसंतीत उतरलेले हे उद्यान केवळ पर्यटकांचेच नव्हे तर संशोधक, बांबूवर काम करणारे अभ्यासक, वन्यजीवप्रेमी अश्या अनेक स्वरूपाने महत्वपूर्ण ठरले आहे. नुकताच येथे शेतकर्यांसाठी मार्गदर्शक ठरलेली बांबू शेती व त्यावर आधारित उद्योग यावरची कार्यशाळा वैशिष्ठ्यपूर्ण ठरली. परिसरातील ग्रामपंचायतीचे सरपंचांचा कार्यशाळेतील सक्रीय सहभाग पाहून शाश्वत विकासात बांबूचे महत्व अधोरेखित झाल्यासारखे वाटते. जगात बांबू उत्पादन व वापरात चिनचा पहिला क्रमांक लागतो.

भारतही मात्र केवळ उत्पादनात दुसरा नंबर लागतो. चिनमध्ये बांबूच्या ३४० हून अधिक प्रजाती आहे. चिनमध्ये बांबू पासून कापड, साबण, विविध गृहपयोगी वस्तू, शरबत व इतर पेय बनविले जातात. भारताची त्या दिशेने वाटचाल सुरु झाली तर अर्थकरणात नक्कीच सक्रीय बदल होतील. भविष्यात प्लॅस्टीक वापराला आळा घालण्याचे सामर्थ्य केवळ बांबू ह्या एकाच गवत प्रजातीत आहे. भारताच्या शाश्वत विकासाच्या प्रवासात बांबू हा खऱ्या अर्थाने एक मैलाचा दगड ठरू शकतो. फक्त आता त्या दृष्टीने राजकीय व प्रशासकीय प्रयत्नांची गरज आहे.

 

@ यादव तरटे पाटील

दिशा फाउंडेशन, अमरावती

संपर्क- ९७३०९००५००

disha.wildlife@gmail.com

www.yadavtartepatil.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *