बहर आलेली बाग कुणाला आवडणार नाही…! झाडं, झुडुपं, घरातील फुलझाडे, रोपटे जे घरातील परसबागेत किंवा आपल्याला हवे त्या ठिकाणी अथवा कानाकोपऱ्यात का होईना मात्र शोभून दिसतात. अगदी घरातल्या खिडकीत असलेलं एकट झाड, त्याच खिडकीजवळ बसून पाहणे हृदयाला आनंदाने भरण्यासाठी पुरेसे आहे. ताणतणावाच्या जागी आनंद पेरण्याची ताकद झाडात अधिक आहे. होय हे खर आहे. प्रत्येकाला हिरवाई मध्ये रमायला आवडते. तेथे एक सत्य आहे की झाड वाढत आहे, हा एक असण्याचा आणि जगण्याचा पुरावाच आहे, कारण वनस्पती उत्तम तणावमुक्त असतात. चांगले आरोग्य, विशेषतः मानसिक आरोग्य वाढविणाऱ्या असतात. मोबाईल, टेलीव्हिजन आणि संगणकाच्या वातावरणात आपण बहुतेक जन आयुष्य जगतच आहोत. तर माझ्यासारखे रानवेडे नैसर्गिक वातावरणाशी संवाद साधून जंगलात जास्तीत जास्त वेळ घालवत असतात. जेंव्हा आपण त्यांच्या सानिध्यात राहतो तेंव्हा विशेषत: वनस्पती मज्जातंतूचे सर्वोत्तम उत्तेजन देणाऱ्या ठरतात. आपण साधलेला वनस्पतींशी सुसंवाद हा सहानुभूतीशील मज्जासंस्थेच्या क्रियाकलापांना दडपतो, डायस्टोलिक रक्तदाब नियंत्रित करतो आणि शारीरिक आणि मानसिक तणाव कमी करतो. यातून आपल्यात आरामदायक आणि सुखदायक नैसर्गिक भावना येतात. आहे ना हे आश्चर्यकारक…! चला तर मग आपण आता पाहूया की वनस्पती आपले मानसिक आरोग्य कसे उत्तम ठेवतात.
पिट्सबर्ग जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल हॉर्टिकल्चर विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या पीअर रीव्ह्यूड रिसर्च पेपर ऑफ प्लांट्सच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यासाठी होणाऱ्या लाभांच्या आढाव्यात अस म्हटलं आहे की, आउटडोर आणि इनडोर झाडे ही मानसिक, सामाजिक, शारीरिक, संज्ञानात्मक, पर्यावरणीय आणि आध्यात्मिक दृष्ट्या कसे प्रभावित करतात आणि चिंता व तणाव कमी करण्यात मदत करतात. थोडक्यात ते आपल्या आत्म व शरीर कल्याणासाठी लाभदायक आहे. आपली स्मृती, संज्ञानात्मक कार्य आणि मानसिक क्षमता सुधारण्यासही मदत करतात विशेषतः मुलांमध्ये ते अधिक प्रभावशाली ठरले आहेत. आपण झाडांच्या किंवा फुलझाडांच्या सानिध्यात राहील्याने नैराश्य कमी होते. यावेळी आपली कार्यरत स्मृती सुधारल्या जाते. यातून आपल्या मेंदूची बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमता देखील वाढते. निसर्गाच्या सानिध्यात किंवा सहवासात राहिल्याने आपली सामान्य मानसिक स्थिती अधिक बळकट होते. इतकंच काय तर राग सुद्धा कमी होण्यास मदत होते. आणखी एक जादू म्हणजे पी.टी.एस. विकार कमी करता येतो. तो असा की निसर्गरोपचारांद्वारे उपचार केल्यावर पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर असलेल्या लोकांच्या जीवनातील सामाजिक आणि भावनिक गुणवत्तेत सुधार संशोधनांती दिसून आली आहे. या अभ्यासात असे दिसून आले की, हे लोक वनस्पतींच्या वाढीसह स्वत: ला ओळखतात आणि पुन्हा एकदा आनंदी होण्याची संधी मिळवतात.
सध्या जग थांबलय, आपण घरात आहोत. सगळ्यांना प्रश्न हा आहे की, करून करून काय करायचं. काल एका मित्राचा न राहवून फोन आला, की करमत नाहीये, मुल देखील आता कंटाळले आहेत. तू काहीतरी कर..! आम्ही मग निवांत बोललो. त्याचं मानसिक दडपण कमी झालं. मला एकूण आठ पुतणे आणि एक भाची आहे. भाची सोसून सगळे एकत्र राहतात. मुल दिवसभर काय करणार ना..? म्हणून मी त्यांना वेगवेगळे उपक्रम द्यायला लागलो. टाकावू मधून टिकावू वस्तु बनविणे, आजी,आई व इतर विषयावर निबंध लिहिणे. मुल हे सगळ अतिशय आनंदाने आणि उत्साहाने करतात आणि आता ती अधिक आनंदी देखील आहेत. अमरावती येथील मानसशास्त्रज्ञ डॉ.माधव दंडाळे यांच्या मते ध्यानधारणा, आवडीच्या छंदाबरोबर आपण निसर्गाची मैत्री सुद्धा अश्यावेळी लाभदायक ठरते. सदर संशोधनात अस पुढे आलं आहे की, निसर्गाच्या सानिध्यात किंवा घरातील परसबाग किंवा झाडाझुडपांच्या सानिध्यात राहिल्याने आपली सर्जनशीलता देखील वाढण्यात मदत होते. खर तर निसर्ग आणि सर्जनशीलता दरम्यान एक सुंदर नात आहे. हा एक दुवा आहे स्वताला स्वताकडे नेण्याचा…! आपण निसर्ग, झाड, फुले, रोपटे यांच्या सानिध्यात काही काळ घालवल्यास आपल्या सर्जनशील आत्म्याला प्रेरणा मिळते आणि यातून आपण चैतन्यमय राहतो. काही लोकांसाठी तर वनस्पती ह्या आपल्या मुलांसारख्या असतात. ते त्यांच्याकडे पाहून असे बोलतात की ते त्यांच्याशी बोलत आहेत. ते आपल्या मुलांप्रमाणेच आणि प्रेमळपणे झाडांचे संगोपन करतात. असे आढळले आहे की झाडांना चांगली बातमी देताना किंवा त्यांना संगीत एकवताना झाडे अधिक चांगले पोसल्याचा पुरावा मिळाला आहे.
वनस्पतींना संवेदना असतात हा शोध लावणारे आपले भारतीयच आहेत. वनस्पतींना संवेदना असतात असं पहिल्यांदा भारतीय वैज्ञानिक जगदीशचंद्र बोस यांनी सांगितलं. आता नवीन संशोधनानुसार वनस्पतींना मेंदू नसला तरी स्मृती असल्याचं दिसून आलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया सेंटर फॉर इव्होल्यूशनरी बायॉलॉजी या संस्थेच्या संशोधिका डॉ. मोनिका गॅगलियानो यांनी लावलेल्या शोधानुसार वनस्पतींना स्मृती असते व त्या यातून अनेक बाबी शिकू शकतात. आज जगासाठी मानसिक तणाव हा एक मोठा मुद्दा बनला आहे. डॉक्टरांच्या मते, तणाव हे सर्व रोगांचे मूळ आहे. जितके आपण यापासून दूर रहाल तितके चांगले आहे. साडेतीन हजार वर्षापूर्वी प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ वाग्भट यांनी याबाबतचे अनेक प्रयोग केले आहेत. जपान मधील तश्योशी मासुवावा यांच्या मते आपण सकाळी उठून पक्ष्यांची किलबिलाट ऐकली तर ते देखील थेरपीसारखे कार्य करते. जपान या देशाने यासाठी फॉरेस्ट थेरपी विकसित केली आहे. सकाळी जेव्हा पक्षी झाडांवर आवाज करतात तेव्हा असे दिसते की ते आपापसात बोलत आहेत. तो किलबिलाट तुम्ही नीट ऐका, ते आपल्या हृदयाचे मनोरंजन करतात आणि तणाव कमी करतात. भारतात हे विद्यान साडेतीन हजार वर्षापूर्वी सांगितल्या गेले. तर स्वत: ला निरोगी ठेवण्याचा जपानी लोकांचा हा मार्ग आता जगभरात प्रसिद्ध होत आहे. हे लेखप्रपंच करण्याच तात्पर्य इतकंच की सध्याच्या ‘कोरोना’ संकटातील ‘लॉक डाऊन’ मध्ये करमणूक म्हणून मोबाईल, टेलिव्हिजन आणि संगणकाच्या पलीकडे जाऊन किंवा इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा झाडे नक्कींच उपयोगाची आहेत. ती कमी तर अजिबातच नाहीत. मात्र आजच वास्तव हे आहे की ‘झाडे मानसिक आरोग्य आणि मानसिक तंदुरुस्तीस महत्त्व देतात’ हे तथ्य आपण अजूनही स्वीकारलेल नाही. चला तर ते स्विकारुया, झाडांशी, निसर्गाशी नव्याने मैत्री करुया. काळजी घेऊया, घरीच राहूया आणि स्वस्थ राहूया…!
@ यादव तरटे पाटील
वन्यजीव अभ्यासक,
दिशा फाउंडेशन, अमरावती
संपर्क – ९७३०९००५००
disha.wildlife@gmail.com
www.yadavtartepatil.com
Wonderful experiment..
Will like to keep knowing about your future endeavors n participate if possible.
Yess sure
Thank you very much sir
वास्तविक निसर्गाच्या उपरोधिक जीवनाचा परिणाम आहे सद्यपरिस्थिती……आताच नाही तर नेहमी करीता मैत्री करूया निसर्गासोबत
अगदी खरय
धन्यवाद ताई
तुमचा लेख वाचला.,.. छान लिहिलंय…. माणसाला मनाला शांतता निसर्गाच्या सान्निध्यात राहूनच मिळते, म्हणुनच साधू संत मुनीं ध्यानधारणा करायला रानावनात गेल्याच दिसतय…. सिध्दार्थ गौतमाला ज्ञानप्राप्तीही पिंपळाच्या झाडाखाली झाली..नि त्यांना बुद्धत्व प्राप्त झाले… त्यासाठी त्यांनी
चोवीस तास ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या पिंपळाच्या झाडाची निवड केली असावी.., निसर्ग तेव्हाच रम्य भासतो जेव्हा माणसाचे मन ही शांत असते… अन्यथा नाही…