कुला आणि कोरकू यांच नात जन्मजातच आहे. आदिवासी ‘कोरकू’च्या संस्कृतीत वाघाला आईचा भाऊ संबोधून ‘कुला मामा’ म्हणून ओळखले जाते. कोरकू आणि कुला यांच नात मेळघाटच्या जंगलात अगदी निरागसतेने फुलत गेल्याचे अनेक दाखले देता येतील. कोरकू लोकगीतांमध्ये देखील कुला मामाचे अनेक संदर्भ आजही आहेतच. मात्र संपूर्ण भारतात वाघाची संख्या कमी होण्याच्या पार्श्वभूमीवर १९७३ मध्ये ‘व्याघ्र प्रकल्प’ या संकल्पनेचा जन्म झाला. वाघाच अस्तित्व धोक्यात येऊ नये म्हणून जंगलातील काही भाग संपूर्णरित्या वाघासाठी संरक्षित ठेवण्यात आला. एकीकडे जल, जमीन आणि जंगलाची होत असलेली फरफट तर दुसरीकडे आदिवासी बांधवांची अधुनिकीकरनाच्या विळख्यात होत चाललेली होरपळ हे सार काही अनाकलनियच…! अलीकडच्या काळात कोरकू आणि कुला यांच्या नात्यात कटुता निर्माण होणारे अनेक प्रसंग घडले हेही वास्तव नाकारता येत नाही. मानव व वन्यजीव संघर्ष आणि वनविभाग व स्थानिक समुदायाच्या संघर्षाच्या घटना देखील घडत आहेत. यातुनच काळाच्या ओघात कोरकू आणि कुला यांचा नातही ईतिहासजमा होते की काय अशी शंका मनात आल्या शिवाय राहत नाही. मात्र ह्या भ्रमांला फाटा देत “बोरीखेडा” गावाने अलीकडेच सिद्ध करून दाखवलय की ‘आम्हीच खरे वाघमित्र..! कोरकू आणि कुला यांच्या नात्यातील या घट्ट विणीवर ब्रिटनचे राजकुमार यांनी “वाघमित्र” पुरस्काराची नुकतीच मोहर उमटवली. जागतिक वन्यजीव निधी (W.W.F.) या संस्थेने मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील ‘बोरीखेडा ग्रामपरीसर विकास समिती’ला व्याघ्र संरक्षणात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘आंतरराष्ट्रीय दर्जाचा वाघमित्र पुरस्कार’ जाहीर केला आहे. या पुरस्काराने मेळघाटच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला हे मात्र नक्की.
आदिवासी आणि गैर आदिवासीच्या हाताला चालना मिळून वनपर्यटन वाढावे रोजगार तसेच पर्यटकाकडून उपद्रव शुल्क वसूल करणे अश्या बहुउद्देशाने राज्य शासनाने २०१२ मध्ये ग्राम परिसर विकास समित्यांची स्थापना केली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सध्या ४७ ग्राम परिसर विकास समित्या आहे. वनविभागाबरोबर येऊन संयुक्तपणे वाघाला वाचविण्याचा संकल्प घेणारी बोरीखेडा ग्रामपरिसर विकास समिती कौतुकास पात्र आहे. बोरीखेडा ग्राम परिसर विकास समितीचे अध्यक्ष गंगाराम सावलकर यांचाच नव्हे तर प्रत्तेक गावकऱ्याच्या यात सिंहाचा वाटा आहे. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि सहायक वनसंरक्षक विशाल माळी व वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर धोटे यांच्या मार्गदर्शनात गाववासीयांनी एक उत्तम पायंडा पाडलाय. गावातील लोकांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येऊन ग्राम परिसर विकास समितीची स्थापना करण्यास पुढाकार घेतला हे विशेष. गेल्या तीन वर्षात गावकऱ्यांनी अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत. ग्राम परिसर विकास समितीमार्फत गावातील लोकांनी वन विभागाची मदत न घेता गावपरिसरातील संपूर्ण वनजमिनीवरील अतिक्रमण काढले. भाकड जनावरे आणि शेळ्या विकून जंगलाला चराईपासून त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतल्या गेली आणि जात आहे. गावातील प्रत्येक घर चुलमुक्त करून एल.पी.जि. आणि गोबर गस चा वापर करायला सुरवात केल्या गेली. ग्रामस्वच्छता अभियान राबविल्या गेले. कोरकुंच्या संस्कुतीचा अविभाज्य अंग असलेली ‘शिडू’ (मोहफुलापासून बनविलेले मद्य) याला देखील बंदी घातली. गावाच्या आजूबाजूंच्या जंगल परिसरात गुरे चरताना दिसले की गावातले लोक त्याला दंड थोटाऊन अवैध चारीईस आळा घालतात. सर्वात महत्वाचे ठरले ते ‘कुला व्हालीबॉल ट्रॉफी’ चे आयोजन. गावकऱ्यांनी वाघाला वाचविण्याचा संकल्प संपूर्ण मेळघाट मध्ये कसा पोहचविता येईल या उद्देशाने ‘कुला व्हालीबॉल ट्रॉफी’ चे आयोजन केले. यात मेळघाट परिसरातील ४८ गावांच्या तब्बल ८४ चमूने सहभाग घेतला. अंगद देशमुख यांच्या सहकार्याने ग्राम परिसर विकास समितीला आम्ही हवी ती मदत केली. संपूर्ण मेळघाट परिसरातील तरुणांनी उत्साहाने यात आपला सहभाग नोंदविला. शेवटी ‘कुला मामा’की जय अश्या जल्लोषाने आणि “कुला बचेगा तो जंगल बचेगा, जंगल बचेगा तो पाणी बचेगा, और पाणी बचेगा तो इन्सान बचेगा” या जयघोषाने स्पर्धेची सांगता झाली हे उल्लेखनीय.
एकूणच बोरीखेडा ग्राम परिसर विकास समितीच्या मदतीने संपूर्ण मेळघाटात आदिवासी बांधव आणि कुला मामाचे नाते पुन्हा नव्याने फुलायला मदत होईल. मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि आदिवासी बांधव यांच्यात असलेल्या नात्याची विनही घट्ट होईल. जंगलाचा राजा वाघ वाचवीण्याचे मोठे आव्हान आमच्यासमोर आज आहे. स्थानिक आदिवासी पर्यायाने संपूर्ण समुदाय संघटन करून मोठा ‘कुला मित्र परिवार’ तयार करूनच आम्ही वाघाला वाचवू शकतो. प्रत्येक ठिकाणी शासकीय यंत्रणा पोहचून काम करण्याला मर्यादा आहेत हे वास्तव नाकारून चालणार नाही. मात्र आपल्या कुलामामाचे रक्षण करण्यास मेळघाट व्याघ्र प्रकल्पाबरोबर आमचा स्थानिक आदिवासी कोरकू आणि इतर समुदाय खांद्याला खांदा देऊन सोबत राहील याचा विश्वास वाटतो. कारण पुरस्कार शेवटी प्रेरणा देतात व जनजागृतीकरिता महत्वाचे ठरतात. वाघाबरोबरच बिबट, अस्वल व इतर प्राणी व पक्षी संवर्धनात याची नक्कीच मदत होईल.
@ यादव तरटे पाटील
दिशा फाउंडेशन, अमरावती
contact – 9730900500
disha.wildlife@gmail.com
www.yadavtartepatil.com
वन्यजीव संवर्धन ही सर्वच देशातील नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आहे. विशेष करून तरुणांची यात महत्वाची भूमिका…
छोटा पाणपोपट हा पक्षी वेडा राघू नावानेच अधिक परिचित आहे. या पक्ष्याच आपण 'वेडा राघू'…
एका गावात एका मुलीला उडणारे पक्षी खूप आवडायचे, पण एक दिवस राजा अचानक पक्षी मारायचं…
Are butterflies poisonous? You will be perplexed if you ask this question. We know that…
फुलपाखरे विषारी असतात का.? हा प्रश्न विचारला तर तुम्ही नक्कीच बुचकळ्यात पडाल. साप, विंचू व…