झाडे संपावर गेली तर…..?
भारतीय संस्कृतीची छाप आजही जगावर कायम आहे. शून्याचा शोध, योग, आयुर्वेद इतकेच नव्हे तर विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगात भारतीय संस्कृतीला आजही जगात मानाचे स्थान आहे. धर्म, रुढी, परंपरा, भाषा अशा अनेक अंगाने आपली वेगळी ओळख आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या भारतात हिंदू, बौध्द, जैन, मुस्लीम असे अनेक धर्माचे लोक राहतात. आपली परंपरा व सन मोठ्या उत्साहाने साजरे करतात. आपल्या संस्कृतीने निसर्गाला श्रद्धेचे स्थान बहाल केलंय. झाडे, नद्या व प्राणीजीवन यांना दैवत रुपाने जगासमोर मांडल्या गेले. नैसर्गिक साधनसंपत्तीची एक आगळीवेगळी ओळख जगाला सांगणारा एकमेव देश म्हणजे आपला भारत देश होय. हत्तीच्या रुपाने गणपती, दुर्गादेवीचे वाहन म्हणून वाघ, मंदिराच्या बाहेर दगडाचा कासव, भगवान शिवशंकराच्या गळ्यात साप व नागपंचमीला नागाची पूजा तसेच वटसावित्रीला वडाची पूजा तसेच दिपावालीचेही आपले एक वेगळेच स्थान आहे. भारतीय संस्कृतीत व्यापक अर्थाने निसर्ग संवर्धन दडले आहे. संस्कृतीच्या चालीरीतीतून नागरिकांनी खऱ्या अर्थाने जल, जमीन, जंगल व जैवविविधतेचे संवर्धन करण्याची ही पौराणिक भूमिका लक्षात घेणे गरजेचे आहे. आज मात्र समाजमनातील ही बाजू अनेक अंगाने विरळ व धुसर होत चालली आहे. हा संवर्धनाचा धागा अधिक घट्ट होणे गरजेचे आहे.
आज भारतात केवळ २१% जंगल शिल्लक आहे. दाट वने तर केवळ १२% आहेत. वास्तविकतः पर्यावरण संतुलित ठेवायचे असेल तर एकूण भूभागाच्या ३३% जंगल असणे अत्यावश्यक आहे. मात्र यामध्ये आपण किती मागे आहोत हे दिसून येते. महाराष्ट्रात सुद्धा केवळ २०% जंगल आहे. यासाठी महाराष्ट्र शासन गेल्या काही वर्षापासून शतकोटी वृक्षलागवड योजना राबवित आहे. सन २०१७ मध्ये आपल्या राज्य शासनाची लिम्का बुक मध्ये नोंद देखील झाली. यावर्षी सुद्धा सामान्य नागरिक व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केल्या गेली. मात्र अजूनही सामान्य नागरिकांचा यामध्ये सहभाग वाढणे आवश्यक आहे. वने टिकली तरच माणूस टिकेल. तरच जैवविविधता शाबूत राहील. जंगल वाचले तर नद्या वाचतील. नद्या वाचल्या तर पाणी वाचेल. आणि पाणी वाचले तर माणूस वाचेल.
महाष्ट्रातील कोकण व सातपुडा पर्वतरांगा समृद्ध आहेत. सह्राद्री, मेळघाट, ताडोबा, पेंच व नवेगाव सारख्या जंगलात आजही समृद्ध जैवविविधता टिकून आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा व जंगले टिकली तरच प्राणवायू मिळतो. झाडामुळे जमिनीवर पालापाचोळा जमा होतो. पावसाचा प्रत्येक थेंब थेट वाहून न जाता जमिनीत मुरतो. म्हनुनच भूजल पातळी वाढते. पर्यायाने जंगलातून झरे फुटतात. ते एकत्र होऊन नद्या वाहायला लागतात. याच नद्यातील पाणी आम्ही प्यायला व शेतीकरिता वापरतो. म्हणजेच एक झाड आम्हाला प्राणवायू देते, आमची तहान भागवते व त्यामुळेच आमच्या पोटाची खळगी देखील भरते. नुसती कल्पना करा की झाडांनी संपावर जायचे ठरविले तर..? झाडांनी मानवाला प्राणवायू दिला नाही तर काय होईल. मानवासकट सर्व जैवविविधतेचे अस्तित्व धोक्यात येईल. हे समजून सुद्धा आज नागरिकांमध्ये याबद्दल प्रचंड अनास्था आहे. नागरिकांना विशेषतः युवा पिढीला माझा एक आग्रह राहील. ‘एक झाड आम्हाला जीवन देते’ निदान त्या भावनेने तरी झाड लाऊन ते जगविले पाहिजे. शासन आपल्या स्तरावर प्रयत्न करीत असतांना सामान्य नागरिकांनी यात सक्रीय सहभाग घेणे गरजेचे आहे. झाडे लावणे ही केवळ शासकीय यंत्रणेची जबाबदारी नसून आपल्या जीवनाशी निगडीत व राष्ट्रीय कर्तव्याची बाब आहे.
प्राणी संग्रहालयात व मंदिरात हत्तीला साखळीने बांधून ठेवणे, मानवी विकासाच्या नावाखाली धरणे, शेती, रेल्वे व रस्ते यामुळे हत्तीचा अधिवास नष्ट करणे, हस्तीदंतासाठी शिकार करणे आणि सरते शेवटी गणेशोस्तव साजरा करणे. अश्या तकलादू श्रद्धेचे प्रतीकात्मक रूप आज आमच्यासमोर उभे झाले आहे. आज गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आवडीने साजरा केला जातो. गणपती बाप्पा येतात आपण दहा दिवस त्यांची सेवा करतो. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या उत्सवातून आजही सामाजिक बांधिलकी जपली जाते यात शंकाच नाही. गणेशोत्सवात दहाही दिवस भरपूर मंडळा मार्फत वेगवेगळे समाजपयोगी कार्यक्रम घेतले जातात. यातून समाजप्रबोधन होते. रक्तदान शिबिरे, अन्नदान, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. मात्र एक गोष्ट कायम मनाला खटकते. गणपती बाप्पा गेले कि आपल्या परिसरातील विहीर, नद्या, तलाव यांची अवस्था गटारीसारखी होते. सगळीकडे प्लास्टिक, निर्माल्य आणि अर्धवट झीजलेल्या व न-विरघळलेल्या मुर्त्या दिसतात. हे पाहून आपली श्रद्धा खरच किती तोटकी आहे याची जाणीव होते. आपण पर्यावरण पूरक गणेशोत्सव वं दुर्गोस्तव साजरा करण्यात आजवर सपशेल अपयशी ठरलो आहे. प्लास्टर ऑफ पॅरीस च्या मुर्त्यांचा वाढता उपयोग, मोठ्या प्रमाणात सजविन्यासाठी वापरण्यात येणारे थर्माकॉल, प्लास्टिकचे चमकीयुक्त व इतर साहित्य यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. तर दुसरीकडे विजेचा अतिवापर व ध्वनी प्रदूषण हे प्रश्न आहेतच. म्हणून पर्यावरण पूरक गणेशोत्सव व पर्यावरण पूरक जीवनशैली आत्मसात करणे गरजचे आहे. दीपावली सुद्धा असाच सन ज्यात मोठ्या प्रमाणात वायू वं ध्वनी प्रदूषण केल्या जाते. अशुद्ध हवा अन कानठळ्या बसतील असा काही सेकंदाचा आवाज अक्ख पर्यावरण धोक्यात घालत आहे.मात्र कुणालाही याच सोयरसुतक नाही. मानव आपल्याच हाताने आपलीच अंतयात्रेची ही तयारी करीत आहे असे म्हणता येईल.
“प्राण्यांची वाढती शिकार हाही चिंतेचा विषय आहे. मागणी नाही तर पुरवठा नाही” या सिद्धांताप्रमाणे घोरपड, तितर, बटेर व इतर वन्यप्राणी विकणाऱ्यांना दोष न देता ते खरेदी करू नका. आपल्या जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी हत्या करू नका. कायद्याने गुन्हा आहेच. मानवीय दृष्टीने देखील ते गैर कृत्य आहे. आपल्या अधिकारावर गदा आली तर आम्ही मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचा कांगावा करतो. प्राण्यांना सुद्धा त्यांचे हक्क आहेत. मात्र बिचाऱ्या वन्यप्राण्याचे कोण ऐकणार..? म्हणून वन्यप्राण्याचे संवर्धन करा. घरातून पिशवी घेऊन निघण्याची पद्धत आम्ही बंद केली म्हणून आज सगळीकडे प्लास्टिक चा ढीग साचलेला दिसतो. सन उत्सव साजरे करण्याची जी अस्सल निसर्ग संवर्धनाची भूमिका त्याच भूमिकेतून आपण सन व उत्सव साजरे करावेत. प्रत्येक काम हे सरकारचे काम नसून आपली जबाबदारी आहे. आपण सरकारच्या ध्येय धोरनावर टीका करण्यात वेळ वाया घालविल्या पेक्षा वन्यजीव व पर्यावरण तसेच स्वच्छ भारत अभियानात आपला सक्रीय हातभार लावावा. हीच खरी देशभक्ती व निसर्गभक्ती ठरेल व यातूनच श्वाश्वत विकास होईल. यातच आपले हित दडलेले आहे. चला तर मग प्रदूषण मुक्त सन साजरे करुया, आणि आपला प्राणवायू जपूया.
@ यादव तरटे पाटील
दिशा फाउंडेशन, अमरावती
संपर्क- ९७३०९००५००
disha.wildlife@gmail.com
www.yadavtartepatil.com