मी आहे चष्मेवाला..! पण मी चष्मा नाही लावत बर का..? आणि हो मी ‘मामा की ऐनक’ सारखा माझा चष्मा डोक्यावर सुद्धा ठेवलेला नाहीये. मग मला चष्मेवाला का बरे म्हणतात..? आहे ना गम्मत..! तर ऐका…!
आता माझ्या फोटोकडे नीट बघा…! माझ्या डोळ्याभोवती पांढरे वर्तुळ दिसतेय न तुम्हाला..! याच डोळ्यांभोवती असलेल्या पांढऱ्या गोलाकार वलयामुळे मी चष्मा लावल्यासारखा दिसतोय तुम्हाला..? म्हणून मला ‘चष्मेवाला’ म्हणतात.
मी चिमणीपेक्षा आकाराने लहान पक्षी आहे. मला इंग्रजीत ‘इंडीयन व्हाईट आय” म्हणतात. माझे शास्त्रीय नाव ‘झोस्टेरॉप्स पाल्पीब्रोझा’ आहे. माझा समावेश पक्ष्यांच्या ‘झोस्टेरॉपिडी’ कुळात होतो. उष्ण कटिबंधीय प्रदेश माझा आवडता अधिवास आहे. भारतात मी वाळवंटी प्रदेशाव्यतिरिक्त सर्वत्र आढळतो. आकारमान व रंगांच्या छटा यांनुसार माझ्या अकरा प्रजाती आढळतात. सोबतच्या छायाचित्रमध्ये मला पहा, म्हणजे माझी ओळख पटायला तुम्हाला मदत होईल. माझ्या पाठीकडचा रंग हिरवट पिवळा तर छाती व उदर यांचा रंग करडा पांढरा असतो. तुम्ही मला आणखी निरखून पाहिल्यास माझी शेपटी गडद तपकिरी रंगाची दिसते. माझी इवलीशी चोच काळी, बारीक, टोकदार असून किंचित वाकडी आहे. आमच्यात नर व मादी असे आम्ही दोघेही सारखेच दिसतो. आम्ही थव्याने राहतो. आमच्या एका थव्यात ५ ते २५ पक्षी असतात. मला झाडांच्या फांदीला उलटे लटकून कीटक खायला खूप आवडतात. मी नेहमी झाडावर किंवा झुडूपांमध्ये राहतो. मला पाणी प्यायचे असले किंवा आंघोळ करायची असली तरच मी जमिनीवर उतरतो. आम्ही समूहाने जरी राहत असलो तरी नर मादी केवळ विणीच्या हंगामातच एकत्र राहतो. मला जर मादीला आकर्षित करायचे असेल तर मी झाडांच्या उंच शेंड्यावर जाऊन मंजूळ गाणे गातो.
लहान कीटक, कोळी, लहान फळे मला खायला खूप आवडतात. इतकंच काय तर पळस, पांगारा, काटेसावर व लहान फुलातील मकरंद माझ्या विशेष आवडीचे आहेत. आम्ही एप्रिल ते जुलै दरम्यान घरटी करतो. आमचे घरटे लहान असते. रेषेदार गवताचे धागे उभे आडवे लाऊन व कोळ्याच्या जाळ्याने विणलेले घरटे आम्ही तयार असते. सुरक्षितता म्हणून आम्ही आमचे घरटे जमिनीपासून दीड ते तीन मीटर उंचीवर करतो. माझी मादी त्या घरट्यात फिक्कट निळ्या रंगांची दोन ते तीन अंडी घालते. नर व मादी असे आम्ही दोघेही घरटे बांधणे, अंडी उबविणे व पिलांना खाऊ घालण्याची कामे करतो. पिल्ले मोठी होईस्तोवर आम्ही त्यांची काळजी घेतो. मग ती त्यांचा संसार थाटायला मोकळी होतात. कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे, परागीभवन करणे हा माझा निसर्गातला महत्वाचा सहभाग आहे. मला पहायला आणि माझे फोटो काढायला पक्षीमित्रांना व वन्यजीव छायाचित्रकारांना खूप आवडते. आहे ना मी सुंदर….! माझा चष्मा (गॉगल) बघून तर लोकं माझ्या प्रेमांत पडल्या शिवाय राहत नाहीत. माझ्या नैसर्गिक सौंदर्याचा तुम्हालाही आनंद घ्यायचं असेल ना…! तर मग माझं संवर्धन करा….! तुम्ही जगा अन मलाही जगुद्या….!
© यादव तरटे पाटील
सदस्य – महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ
सर, सोबत इंग्रजी स्थानिक नावे दिली तर बरे होईल.
नक्कीच सर धन्यवाद’सर
खुप छान झाल चष्मेवाल्याच स्वगत…. हा छोटासा पक्षी माझ्या घराच्या आवारात असलेल्या झाडांवर दुपारी ३ नि संध्याकाळी ५ वाजता न चुकता येत असतो….पक्ष्यांचे पण टायमिंग ठरलेले असतात बहुधा…मी या पक्ष्याच निरीक्षण दुरुन केलंय… लेख आवडला मला… छान लिहिलंय तुम्ही….
धन्यवाद Madam पक्षी सुंदर आहे. आपण निरीक्षण करत आहातच
सुंदर माहिती यादवभाऊ।निरीक्षण तर खूपच उत्तम। आपले सर्वच लेख माहितीपर असतात यात शंकाच नाही। असेच लिहीत जा व सर्व वाचकांच्या ज्ञानात भर पडू द्या ही विनंती।
धन्यवाद गुरुजी आपला आशीर्वाद आहे.
नेहमीप्रमाणेच खूपच छान माहिती मिळाली.
धन्यवाद Madam
खरचं माहिती खूप छान आहे सर
धन्यवाद आभारी आहे.
Apratim
Thank you very much
चस्मेवाला .. समर्पक नाव… अप्रतिम माहिती दिली सर…
धन्यवाद सर
Nice article sir, really your keen knowledge is useful for nation to conserve and protect birds and their environment. Thank you very much
Thank you so much Madam
खूप छान माहिती यादवराव
धन्यवाद सर
सर..छान व पक्षाची ईत्यंभूत माहिती ..छान वाटली
धन्यवाद सर