Categories: ArticleForestNature

डोगे डिज ‘जगलीमलाय..!’

डोगे डिज ‘जगलीमलाय..!’

आपल्या भारताची जैवविवीधतेच्या बाबतीत जगातील काही प्रमुख राष्ट्रामध्ये स्वतंत्र अशी ओळख आहे. जगातील काही निवडक समृद्ध जैवविविधता असलेल्या १० राष्ट्रामध्ये भारताचा समावेश होतो. संपूर्ण भारतात हिमालयापासून ते कन्याकुमारी पर्यंत, सातबहिणींच्या प्रदेशापासून ते राजस्थानातील वाळवंटात नाना प्रकारच्या सजीवांनी नटलेली समृद्ध अशी विविधता आहे. बर्फाळ प्रदेशात राहणारा स्नो लेपर्ड व अनेक हिमालयीन पक्षी, फक्त गुजरातमधील गीरच्या जंगलात आढळणारा सिंहजंगली गाढव, संपूर्ण भारतात फक्त मेळघाटच्या जंगलात आढळणारा रानपिंगळा हा पक्षी, अशी एक ना अनेक याची उदाहरणे देता येतील. याच जैवविवीधतेतील महत्वाचा घटक ‘कोळी’ असून कोळी हे संपूर्ण भारतभर मोठ्या प्रमाणात आढळतात. कोळ्यांना लागनारे सर्व प्रकारचे पोषक वातावरण आपल्या भारतात अगदी सहज उपलब्ध आहे. प्राणी,पक्षी यासोबतच कोळ्यांच्या जैवविवीधतेतही आपला भारत मागे नाही. जगातील कोळ्यांच्या एकूण १११ कुळापैकी आपल्या भारतात ६१ प्रकारची तर मेळघाट मध्ये ४९ प्रकारची कुळे (Family) आढळतात. जगातील ४३,२४४ प्रजाती पैकी भारतात १,६९२ प्रकारचे कोळी आढळतात. मेळघाटातील कोळ्यांची जैवविवीधता देखील अतिशय समृद्ध आहे.

मेळघाट च्या जंगलात मी अनेक वर्षापासून पदभ्रमण करतोय. एकदा कोरकू वाटाड्या सोबत पदभ्रमण करताना ‘ज्यायंट वूड स्पायडर’ ला पाहून तो अचानक पुटपुटला. ‘सायेब डोगे डिज जगलीमलाय…!’ म्हणजे ‘साहेब तो पहा कोळी’ असे त्याला म्हणायचे होते. त्या दिवशी माझ्या कोरकुंच्या वन्यजीवनविषयी असलेल्या शब्दकोशात एका नव्या शब्दाची भर पडली. मेळघाटमधील स्थानिक आदिवासी कोरकू कोळ्याला ‘जगलीमलाय’ म्हणतात. त्यांच्या बोलीभाषेत सर्व प्रकारचे कोळी म्हणजे जगलीमलायच. आकार आणि कोळ्यांचे दिसणे या बाबतीत म्हणजेच त्यांच्या प्रजातीबाबत त्यांना फारसे माहित नाही. सगळ्या प्रकारचे कोळी हे एकाच नावाने संबोधिले जातात. कोरकू लोक कोळ्यांना कोणतीही इजा पोहोचवत नाहीत. मात्र जनमाणसात कोळी या सजीवाबद्दल बरेच गैरसमज असून यामुळे यांच्याकडे आजवर दुर्लक्ष झालेले आहे. भारतात कोळ्यावर हव तेवढ संशोधन अजूनही झालेले नाही. म्हणूनच जर का कोळ्यांवर भारतात संशोधन झाल्यास आणखी खूप वेगवेगळ्या प्रजातीचे नक्कीच आढळू शकतात. कोळी हे अभ्यासने गरजेचे असून त्याचा आपल्या अन्नसाखळीत खूप महत्वाचा वाटा आहे. पक्षी व इतर सजीवांचे ते मुख्य खाद्य असून त्यांचे संरक्षण व संवर्धन होणे गरजेचे आहे. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन प्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञ डॉ. जी. एन. वानखडे यांनी मेळघाटातील कोळ्यांचा अभ्यासाला सुरवात केली. डॉ. जी. एन. वानखडे यांच्या सानिध्यात राहून व पक्षी, फुलपाखरे व जंगलातील इतर सजीवाचा अभ्यास करण्याच्या माझ्या सवयीतून माझही कोळ्यांशी नात जुळल्या गेल. डिसेंबर-२००८ मध्ये सातपुडा पर्वतरांगा मध्ये पहिल्यांदाच मी ‘टॅरांटुला’ (Tarantula) या आकाराने सर्वात मोठा असणाऱ्या कोळ्याची सर्वप्रथम नोंद केली. कोळ्याच संशोधन हे फार किचकट आहे. त्याला एका विशिष्ठ शास्त्रीय अभ्यासाची पार्श्वभूमी असली तर त्यावर संशोधन करणे अगदी सोप्प होऊन जाते. मात्र पक्षी व फुलपाखराप्रमाने ते नक्कीच सोप नाही. त्यामुळे मला संशोधनाऐवजी त्यांच्या संरक्षण व संवर्धनात जास्त रस वाटतो. कारण अन्नसाखळीत कोळ्यांचा वाटा अतिशय महत्वपूर्ण आहे. स्वस्थ पर्यावरणाचे कोळी सुद्धा द्योतकच आहेत.

कोळी हा ‘संधिपाद’ संघातील ‘अॅरॅक्निडा’ वर्गाच्या ‘अॅरेनीडी’ या गणातील व रेशमासारखा धागा सोडणारा अष्टपाद प्राणी आहे. जिथे जिथे कीटक खायला मिळतात तिथे तिथे कोळी आढळतात. जंगलात, शेतीशिवारात, घरात, घरातील बागेत, वाळवंटी भागात, दलदलीच्या प्रदेशात, उंच पर्वतावर, खाणींमध्ये थोडक्यात सर्वत्रच कोळी आढळतात. कोळी हे भूचर, वृक्षचर  असले तरी त्यांच्या काही जाती सागरकिनारी पाण्यालगत आढळतात. कोळ्यांची लांबी ३ मि.मी.लहान असते तर ‘टॅरांटुला’ जातीचे काही कोळी पाय पसरले असता २५ सें.मी.पर्यंत लांब असतात. कोळी बहुधा करड्या, तपकिरी किंवा काळ्या रंगाचे असतात. मात्र काही कोळी आकर्षक रंगांचे सुद्धा असतात. काही कोळ्यांचे शरीर केसाळ असून ते अतिशय संवेदनशील असतात. कोळ्यामध्ये जरा अजबच आहे कारण नर कोळी हा साधारणतः ८ ते १० पट आकाराने मादीपेक्षा लहान असतो. काही प्रजातीमध्ये नर-मादीचे मिलन झाल्यावर मादी ही नराला खाऊन टाकते. कोळ्यांना मागील भागात विशिष्ठ प्रकारची ग्रंथी असते. त्यातून सतत रेशमासारखे जाळे निघत असते. कोळी हे ‘स्पिंनरेट’ नावाच्या ग्रंथीमधून अतिशय बारीक पण चमकदार रेशमासारखा धागा सतत बाहेर टाकत असतो. हा धागा तुलनेने अतिशय टणक असतो व वजनाला हलका असतो. कोळ्यांचे जाळे हे ‘अॅटीबायोटीक’ असते म्हणून सूर्यपक्षी (Purple-rumped Sunbird) सारखे पक्षी आपल्या घरटयांना आतून कोळ्यांच्या जाळ्यांचा थर लावल्याचे मी पाहीले आहे. त्यामुळे त्यांची पिले सुरक्षितही राहतात व जाळे ही मऊ असल्यामुळे त्यांना इजाही होत नाही. तसेच चुकून त्यांना इजा जर झाली असेल तर ती बरी होण्यासही मदत होते. लहानमोठे सर्व प्रकारचे कीटक हे कोळ्यांचे खाद्य आहे. खऱ्या अर्थाने कृषिप्रधान देश असलेल्या आपल्या भारतातील शेतकऱ्यांचे कोळी सुद्धा खरे मित्रच आहेत. शेतकरी आपल्या शेतात कीटकांना मारण्यासाठी किटकनाशकाची फवारणी करतात. कीटकनाशकामुळे प्रदूषण तर होतेच शिवाय अनेक पिकाला फायद्याचे असणारे कोळी मरतात. पिकांचे नुकसान आणि प्रदूषण टाळायचे असेल तर शेतकऱ्यांनी कोळ्यांचे संवर्धन केले पाहिजे. तद्वतच पक्षी हे आपल्या पिलांना कोळी खाऊ घालतात. थोडक्यात कोळी हे काही पक्षी व सरडे यांचे आवडते अन्न आहे. कोळी डासही खातात. कोळी उडणाऱ्या डासांना तसेच पाण्यात असलेल्या त्यांच्या अळ्यानासुद्धा खातात म्हणूनच कोळी हा एक महत्वाचा प्राणी आहे. कोळ्यांच्या जाळ्यापासून बनवलेले कपडे सूर्याच्या जमिनीवर पडणाऱ्या अतिनील किरणापासून (Ultra violet rays) आपले संरक्षण करतात. कोळ्यांच्या जाळ्यांच्या धाग्याचा रंग चंदेरी किंवा सोनेरी, हिरवा, पांढरा, तपकिरी ही असू शकतो. ’टॅरांटूला’ सारखे काही कोळी हे जमिनीत बिळ करून राहतात. त्यामुळे जमिनीत पाणी जास्त प्रमाणात निचरा होण्यास मदत होते. त्यामुळे आपली जंगले टिकण्यास मदत होते. जमिनीवर पडलेला कचरा अनेक कीटक खातात आणी नंतर ह्या कीटकांना कोळी खातात. त्या कोळ्यांना पक्षी खातात. म्हणजेच पक्ष्यांच्या मुख्य खाद्यापैकी कोळी हा एक महत्वाचा घटक आहे. अन्नसाखळीत कोळी हा अतिशय महत्वाचा घटक आहे. तसेच कोळ्यांनी टाकलेली विष्टा ही त्याच जमिनीत पडते व त्यामुळे जमिनीची पोत सुधारन्यास अल्प प्रमाणात का होईना मदत होते.

आजच्या घडीला भारतातील मेळघाट चे जंगल हे कोळ्यांच्या बाबतीत जगाच्या नकाशावर महत्वाचा परिसर समजला जातोय. कारण संपूर्ण भारतातील संशोधकांचे लक्ष मेळघाट कडे लागले आहे.आज अनेक संशोधक आपल्या भागात कोळ्यांचा अभ्यास करायला येत आहेत. चला तर मग कोळ्यांच्या बाबतीत आपल्या मनात असलेले सगळे गैरसमज दूर करुया. निसर्गाच्या या अजब गजब विश्वाची सफर करुया. कोळ्यांना जाणून घेऊया. त्यांचे संवर्धन व संरक्षण करुया.

@ यादव तरटे पाटील

दिशा फाउंडेशन, अमरावती

संपर्क- ९७३०९००५००

disha.wildlife@gmail.com

www.yadavtartepatil.com

Yadav

Auther is a Member of Maharashtra State Board for Wildlife, wildlife conservationist, eminent nature activist, columnist & working for wildlife, environment & for tribal youth since 20 years. He is also working for anti-poaching, green administration & green journalism. He is also Founder of Disha foundation, Amravati based Organisation.

Recent Posts

तरुणांनो वन्यजीवांची हाक ऐका…..!

वन्यजीव संवर्धन ही सर्वच देशातील नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आहे. विशेष करून तरुणांची यात महत्वाची भूमिका…

4 years ago

मी चष्मेवाला

मी आहे चष्मेवाला..! पण मी चष्मा नाही लावत बर का..? आणि हो मी ‘मामा की…

4 years ago

वेडा नसलेला ‘वेडा राघू’

छोटा पाणपोपट हा पक्षी वेडा राघू नावानेच अधिक परिचित आहे. या पक्ष्याच आपण 'वेडा राघू'…

4 years ago

फ्रेंडशिप डे निसर्गाचा…!

एका गावात एका मुलीला उडणारे पक्षी खूप आवडायचे, पण एक दिवस राजा अचानक पक्षी मारायचं…

4 years ago

Beauty with Poison…!

Are butterflies poisonous? You will be perplexed if you ask this question. We know that…

4 years ago

सौंदर्यात दडलंय विष…!

फुलपाखरे विषारी असतात का.? हा प्रश्न विचारला तर तुम्ही नक्कीच बुचकळ्यात पडाल. साप, विंचू व…

4 years ago